‘सेल्फी स्टिक’न वाचविला जीव
स्कूबा डायव्हिंग हा एक लोकप्रिय साहसी क्रीडाप्रकार आहे. यात समुद्रात उडी मारुन पाण्याच्या पृष्ठभागाखालून पोहायचे असते. काही दिवसांपूर्वी झू मान नामक एक चीनी महिला डायव्हर मालदीवमध्ये हा खेळ खेळताना समुद्रात बुडाली होती. तथापि, एका ‘सेल्फी स्टिक’ने तिचा जीव वाचविला. ही घटना सध्या सोशल मिडियावर गाजत आहे. झू मानने आपल्या काही मित्रमैत्रिणींसह स्कूबा डायव्हिंगच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. एका प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात त्यांचा गट हा खेळ खेळणार होता. समुद्रात उडी मारण्यापूर्वी डायव्हिंग किटला जोडलेले ‘सरफेस मार्कर’ हे साधन उघडायचे असते. तथापि, तिचा प्रशिक्षक हे साधन उघडण्यात अयशस्वी झाला होता. त्यामुळे ज्या नौकेतून हे स्कूबा डायव्हिंग होणार होते, या नौकेला झू मान समुद्रात नेमकी कोठे आहे, याचा पत्ता लागला नाही. परिणामी. ती जवळपास 40 मिनिटे पाण्यातच बुडालेल्या अवस्थेत राहिली.
अशा अवस्थेत डायव्हरच्या जीवाला धोका निर्माण होतो. कारण ऑक्सिजन सिलिंडमधील ऑक्सिजन संपण्याची भीती असते. मात्र, हा प्रकार लक्षात आल्यानंतर झू मान हिने प्रसंगावधान राखून तिने सरफेस मार्कर हे साधन आपल्याजवळ असणाऱ्या सेल्फी स्टिकला बांधले आणि सेल्फी स्टिक वर उचलून समुद्राच्या पृष्ठभागावर काढली. ती जवळून जाणाऱ्या एका मच्छीमार नौकेतील खलाशांनी बघितली. त्यामुळे त्यांनी त्या सेल्फी स्टिकचा मागोवा घेत, समुद्रात तिचा शोध घेतला. तिला समुद्राच्या पृष्ठभागावर आणण्यात ते यशस्वी ठरले. अशा प्रकारे तिचा जीव वाचला. संकटात सापडल्यानंतर डोके थंड ठेवून संकटमुक्तीचा मार्ग शोधल्यास यश मिळू शकते, हे या प्रसंगातून दिसून आले आहे. डोके शांत ठेवून परिस्थितीचा विचार केल्यामुळेच या महिलेला तिच्या सुटकेचा मार्ग सुचला आणि ती आपला जीव वाचवू शकली. हीच शिकवण या प्रसंगातून मिळते.