महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञानविज्ञान युक्त आत्मज्ञानी ईश्वराचे सगुण रूप असतो

06:36 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, आत्मज्ञानी माणसाला कोणत्याही गोष्टींचा साठा करून ठेवावा असं वाटत नसतं. त्याला खात्री असते की, आपला योगक्षेम ईश्वर चालवत आहेत. अशा मनुष्याने उदरनिर्वाह होईल इतपत जरी कर्म केलं तरी पुरेसं होतं. अधिक कोणतीही कामं त्यानं केली नाहीत तर ती त्यानं टाळली असं म्हणता येत नाही कारण कुटुंबियांप्रति असलेलं कर्तव्य त्यानं पार पाडलेलं असतं. सबब त्याला कर्म टाळण्याचे पातक लागत नाही.

Advertisement

यावर विचार केला तर लक्षात येतं की, मनुष्याला ईश्वराने खूप कमी कार्य नेमून दिलेलं आहे पण हे हवं, ते हवं अशा हव्यासापोटी माणसाने त्याचे व्याप वाढवून ठेवले आहेत. अनेक गोष्टी हव्या असल्याने त्या मिळवण्यासाठी पैसा हवा. तो मिळवण्यासाठी मनुष्य जादा काम करतो. हवी असलेली वस्तू मिळाली की, त्याला नव्या वस्तूचा ध्यास लागतो. त्यासाठी पुन्हा जादा काम करतो. हे दुष्टचक्र माणसानं त्याच्यामागे आपणहून लावून घेतलेलं असतं आणि त्यापोटी स्वत:च्या जीवनातील शांती आणि समाधानाचा बळी दिलेला असतो. पण जो कोणी ईश्वराने दिलेलं काम करून स्वस्थ राहील तो समाधानी आयुष्य घालवेल कारण ते काम त्याचा उदरनिर्वाह चालेल एव्हढंच असतं. याचा अर्थ माणसानं समाधानी राहण्यासाठी उदरनिर्वाह चालेल एव्हढं काम केलं तरी पुरेसं आहे.

त्याने पार पडलेल्या कर्तव्यकर्मातून त्याला कोणतेही बंधन लागू होत नाही. तो करत असलेले कर्म केवळ कर्तव्य म्हणून तो करत असतो त्यामुळे त्यांची कर्मे नि:शेष लय पावतात. ह्या अर्थाचा अखिलैर्विषयैर्मुक्तो ज्ञानविज्ञानवानपि । यज्ञार्थं तस्य सकलं कृतं कर्म विलीयते  ।।29 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. आपण ईश्वराचे अंश असून समोर जे जे दिसतंय ती सर्व ईश्वराची माया आहे हे जो जाणतो तो जीवन्मुक्त असतो. बऱ्याच लोकांना हे माहीत असतं पण हे नुसतं माहीत असून भागत नाही त्यानुसार कृती घडावी लागते. मोह, माया तसेच इतर षड्रिपूंच्या प्रभावाखाली न येता जीवन जगता यायला हवं. सगळ्यांच्याकडं सारख्या नजरेनं पहायला यायला हवं. रेल्वे प्रवासात आपल्या बरोबर असलेल्या लोकांशी आपण प्रेमाने बोलतो. त्यांच्या बरोबर हसतखेळत वेळ घालवतो. उतरताना त्यांचा प्रेमाने निरोप घेतो. हे सर्व सहजी घडतं कारण आपल्याला त्यांच्याकडून केवळ सोबत हवी असते व इतर काही नको असतं. इथं कोणताही व्यवहार नसतो. तसं जीवनात जे जे भेटतील, मग ते घरातील असोत वा बाहेरील असोत त्या सगळ्यांशी अत्यंत प्रेमाने वागता, बोलता यायला हवं. हे सर्व मनुष्याला तेव्हाच जमतं जेव्हा त्याला कुणाकडून कोणतीही अपेक्षा नसते. अपेक्षा आली की, अपेक्षाभंगाचं दु:खही आलं. बाप्पा म्हणतात, समोर दिसतंय ते सर्व नाशवंत आहे आणि म्हणून असत्य आहे आणि असत्य गोष्टीतून काय अपेक्षा बाळगायची? हे ज्ञान झाल्यावर जगात वागायचं कसं हे ज्याला कळलंय आणि जो त्याप्रमाणे वागतो त्याला विज्ञान समजलंय असं म्हणायला हरकत नाही. अशा ज्ञानविज्ञान युक्त मनुष्याने केलेली कर्मे त्याला बाधू शकत नसल्याने त्याने केलेले कर्म तो स्वत: करत नसून ईश्वरच करत आहे असे समजावे कारण ज्ञानविज्ञान युक्त मनुष्य ईश्वराचे सगुण रूप असतो.

सदासर्वदा नि:संग असलेल्या आत्मज्ञानी माणसाची शरीरयात्रा प्रारब्धकर्मानुसार यंत्रवत चालू असते. अपेक्षा नसल्याने तो करत असलेले कार्य वासनेतून होत नसते. अंत:करणाचा संयम होत असल्याने मनाचे कार्य बंद असते. वस्तूचा संग्रह करण्याचा इरादा नसल्याने वस्तूची प्राप्ती, रक्षण, वृद्धी ह्यासाठी प्रयत्न करायची गरज भासत नाही. अशी निरुद्देश कर्म करत राहिल्याने त्याची सर्व कर्मे नि:शेष लयाला जातात म्हणजे ती केल्याने त्यातून फलस्वरूप पाप, पुण्याची निर्मिती होत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article