न्यूझीलंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून दुय्यम संघाची निवड
टी-20’ लीगला महत्त्व दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ कडून टीका
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने कसोटी क्रिकेटला फारसे महत्त्व दिले जात नसल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळावर आणि बीसीसीआयसह विविध आघाडीच्या क्रिकेट मंडळांवर टीका केली आहे. दक्षिण आफ्रिकेने कसोटीपेक्षा त्यांच्या ‘टी-20’ लीगला प्राधान्य देऊन न्यूझीलंड दौऱ्यासाठी दुय्यम कसोटी संघ निवडल्यानंतर वॉने ही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका’ने पुढील महिन्यात होणार असलेल्या न्यूझीलंडविऊद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दुय्यम संघाची घोषणा केली असून त्यात नवीन कर्णधारासह राष्ट्रीय संघातर्फे यापूर्वी न खेळलेले सात खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेचे अव्वल क्रिकेटपटू ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका’ आणि इंडियन प्रीमियर लीगमधील गुंतवणूकदार यांनी सुरू केलेल्या ‘साऊथ आफ्रिका 20’ या ‘टी-20’ लीगच्या दुसऱ्या आवृत्तीत खेळण्यासाठी करारबद्ध झालेले असून ही लीग नेमकी त्या दौऱ्याच्या वेळी होणार आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या निर्णयानुसार, सदर लीगमधील संघाशी करार केलेला कोणताही खेळाडू कसोटीसाठी निवड करण्यास पात्र नाही. ‘यावरून स्पष्ट होते की, त्यांना पर्वा नाही. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने घेतलेल्या निर्णयातून भविष्यात काय घडेल याचे संकेत मिळत असून सर्वोत्कृष्ट खेळाडूंना मायदेशी ठेवणे हेच घडायला लागेल, असे वॉने सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना म्हटले आहे.
जर मी न्यूझीलंडच्या जागी असतो, तर मी मालिकाही खेळलो नसतो. न्यूझीलंड क्रिकेटबद्दल आदर नसल्याचे त्यांनी दाखवून दिलेले असतानाही ते का खेळू पाहत आहेत ते मला माहीत नाही, असे वॉने पुढे म्हटले आहे. यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर जाऊन आपल्या चिंता व्यक्त करताना म्हटले होते की, कसोटी क्रिकेटच्या शेवटाचा हा एक निर्णायक क्षण आहे का ? भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळांसह ‘आयसीसी’ने खेळाच्या या शुद्ध स्वरूपाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच पाऊल उचलले पाहिजे.