महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्नाटकमधील योगिराज यांच्या मूर्तीची निवड! अयोध्येत 18 जानेवारीला स्थापित होणार

06:55 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 22 जानेवारीला ‘प्राणप्रतिष्ठा’

Advertisement

वृत्तसंस्था / अयोध्या

Advertisement

कर्नाटकचे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगिराज यांच्याच राममूर्तीची निवड प्राणप्रतिष्ठेसाठी करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख चंपत राय यांच्याकडून ही घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. एका विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी येत्या सप्ताहातील कार्यक्रमाची माहिती दिली. या मूर्तीची स्थापना भव्य राममंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी दोन दिवस, अर्थात, 18 जानेवारी केली जाईल. 22 जानेवारीला ‘प्राणप्रतिष्ठा’ कार्यक्रम होणार आहे.

प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक महत्वाच्या सोहळ्याचा शुभप्रारंभ येत्या सोमवारी, 22 जानेवारी 2024 या दिवशी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे. हा सोहळा दुपारी 2 पर्यंत चालणार आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी चंपत राय यांनी ही घोषणा करण्याचे औचित्य साधले आहे. अयोध्येसमवेत सारा देशच आता राममय होत असून अवघ्या आठवड्याभरात होणाऱ्या या कार्यक्रमाकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अयोध्येत कार्यक्रमाची जोरदार सज्जता करण्यात येत आहे.

संपणार 5 शतकांची प्रतीक्षा

परकीय आक्रमकांनी रामजन्मभूमीच्या स्थानावर अतिक्रमण केल्यानंतरचा 5 शतकांहून अधिकचा काळ हिंदूंसाठी संघर्षाचा होता. पण हिंदूंनी धीर न सोडता सातत्यपूर्ण पद्धतीने हा संघर्ष त्याच्या अंतिम साफल्यापर्यंत पोहचविला. आता ही संघर्षमय प्रतीक्षा संपण्याचा क्षण नजीक आला असून सर्व भारतीय नागरिकांच्या मनात आता आनंद आणि समाधानाची भावना आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

16 जानेवारीपासून अनुष्ठान

16 जानेवारीपासून, अर्थात मंगळवारपासून प्रभू रामचंद्रांच्या या मंदिरात प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. हे अनुष्ठान 21 जानेवारीपर्यंत, अर्थात, येत्या रविवारपर्यंत चालणार आहे. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा होणार आहे, अशीही माहिती चंपत राय यांनी दिली.

मूर्ती बालस्वरुप रामाची

गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होणारी मूर्ती 5 वर्षे वयाच्या बालस्वरुप रामाची असेल. या मूर्तीचे वजन साधारणत: 150 ते 200 किलोग्रॅम इतके आहे. भगवान रामलल्ला यांची जी विद्यमान मूर्ती आहे, तीही अरुण योगिराज यांनी निर्माण केलेल्या या मूर्तीसमवेत गर्भगृहातच स्थानापन्न केली जाणार आहे. योगिराज यांची मूर्ती कृष्णपाषाणातील आहे, अशी माहिती चंपत राय यांनी दिली आहे.

कार्यक्रमासाठीचे प्रमुख आमंत्रित

प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानाच्या कार्यक्रमासाठी देशभरातून 121 आचार्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ते सर्व उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठासमयी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महंत नृत्यगोपालदास महाराज, हिंदूंच्या 150 हून अधिक परंपरांमधील साधूसंत, 50 हून अधिक जनजाती आणि वनवासी परंपरांमधील संत यांची उपस्थिती असेल. प्राणप्रतिष्ठा समारोहाच्या आधी सकाळी 10 वाजल्यापासून प्राणप्रतिष्ठा मुहूर्तापर्यंत मंगलध्वनीचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारतातील विविध राज्यांमधील प्रमुख 25 वाद्ये आणि दुर्लभ वाद्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांचे संबोधन होणार

प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देशाला उद्देशून संबोधन करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही भाषण करतील. भारतातील तसेच जगभरातील सर्वांना हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.

चंपत राय यांच्या घोषणा

प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठान : 16 जानेवारीपासून 21 जानेवारीपर्यंत

प्राणप्रतिष्ठेच्या आधी : सकाळी 10 ते 12.15 पर्यंत मंगलध्वनी

मुख्य प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम : दुपारी 12.20 ते 2.00 वाजेपर्यंत

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर : पंतप्रधान मोदींचे देशासाठी संबोधन

प्राणप्रतिष्ठा मूर्ती : कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगिराज निर्मित

मूर्तीचे स्वरुप : पाच वर्षे वयाच्या बालरामाच्या स्वरुपातील मूर्ती

कार्यक्रमाचे आमंत्रण : हिंदू समाजातील सर्व घटकांतील साधूसंतांना

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article