कंग्राळी खुर्दच्या पाच मल्लांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावच्या पाच उदयोन्मुख कुस्तीपटूंनी सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल श्री बाल हनुमान तालीम मंडळ व कंग्राळी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. माजी अध्यक्ष पैलवान भाऊ पाटील होते. गावातील कुस्तीपटू श्रेयस मनोहर पाटील, प्रथमेश दीपक पावशे, ध्रुव खजगोनट्टी, महिला कुस्तीपटू गौतमी नारायण पाटील, सिद्धी प्रशांत निलजकर या पाचही कुस्तीपटूंनी त्यांच्या वजनी गटात जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
त्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. तसेच एक कुस्तीपटू प्रथमेश प्रवीण पाटील यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली असल्याने या सर्वांचा श्री बाल हनुमान तालीम मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करत ग्रा. पं. आजी-माजी सदस्य व तालीम मंडळ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, राकेश पाटील, माधव पाटील, प्रवीण पाटील, किरण पाटील, मनोहर पाटील, भैय्या पाटील, निवृत्त जवान सोमनाथ पाटील, जोतिबा पाटील, अमोल पाटील, प्रशांत निलजकरसह श्री बाल हनुमान तालीम मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.