महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समितीशी एकनिष्ठ असणाऱ्यांचीच निवड करा

12:16 PM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मराठा मंदिर येथील बैठकीचे कार्यकर्त्यांचा सूर : तालुका म. ए. समिती कार्यकारिणी निवडीसाठी 35 जणांच्या कमिटीची नियुक्ती 

Advertisement

बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करून कार्यकारिणीवर सदस्यांची निवड करण्यासाठी 35 जणांच्या सदस्यांची कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील मराठा मंदिरमध्ये माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीशी एकनिष्ठ असणाऱ्यांचीच निवड करा, असा सूर कार्यकर्त्यांनी मांडला. तालुका म. ए. समितीची कार्यकारिणी रद्द करण्यात आली आहे.याची घोषणा बैठकीत करण्यात आली. पुनर्रचना करण्यासाठी 13 जणांच्या संपर्क सदस्यांची यापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. तालुक्यातील 135 गावांना सदर संपर्क समितीच्या सदस्यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. या माध्यमातून गावागावातून 400 जणांनी कार्यकारिणीवर निवड करण्यासाठी नावे दिली आहेत. या यादीतील नावांची छाननी करून कार्यकारिणीवर सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते.

Advertisement

या बैठकीला तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या. तरुणांना संधी देण्याच्या उद्देशाने जुनी कार्यकारिणी रद्द करून पुनर्रचना करण्यात येणार आहे. यामध्ये 400 जणांनी नावे नोंदविली असली तरी समितीशी एकनिष्ठ असणाऱ्या आणि समितीच्या लढ्याची पार्श्वभूमी माहीत असणाऱ्या कार्यकर्त्यांचीच कार्यकारिणीवर निवड करण्यात यावी, अशी सूचना कार्यकर्त्यांनी मांडली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली निवडून आल्यानंतर इतर राष्ट्रीय पक्षांशी हात मिळविणी करून तडजोडीचे राजकारण करणाऱ्यांना यापासून दूर ठेवावे. सीमाप्रश्नाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाची माहिती असणे आवश्यक आहे. सर्वांना एकत्र घेऊन जुन्या-नव्यांची सांगड घालून वाटचाल करणे आवश्यक आहे. अशा सदस्यांनाच कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात यावे. सीमालढ्याच्या चळवळीमध्ये योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांची निवड झाली पाहिजे, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, निवड केल्या जाणाऱ्या सदस्यांच्या निवडीवरून वेगवेगळे विचार मांडण्यात आले. यामध्ये जुन्या-नव्यांचा समावेश असावा, असे मतही मांडण्यात आले. तर काही जणांनी कायद्याची व लढ्याची जाणीव असणाऱ्या अभ्यासू सदस्यांची निवड क्हावी, असे विचारही मांडले. समितीच्या प्रत्येक बैठकीला, लढ्याला व मराठी भाषिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याबरोबरच लढ्यांसाठी तत्पर राहणाऱ्या सदस्यांनाच स्थान देण्यात यावे. तसेच समितीच्या लढ्यामध्ये अनेक महिलाही सक्रियपणे सहभागी असतात. त्यामुळे महिलांनाही या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी एम. जी. पाटील यांनी बैठकीचा विषय मांडला. दरम्यान, डी. बी. पाटील, आर. एम. चौगुले, मनोज पावशे, मनोहर हुंदरे, कृष्णा हुंदरे, शिवाजी खांडेकर, बी. ए. मोहनगेकर, रामचंद्र मोदगेकर, पीयूष हावळ, आर. के. पाटील आदी कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी कार्यकर्त्यांचे विचार लक्षात घेऊन संपर्क समितीमधील 13 सदस्यांसह इतर जुन्या जाणत्या व नवीन एकूण 35 जणांची कमिटी नियुक्त करून कार्यकारिणीवर सदस्यांची निवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मध्यवर्ती म. ए. समितीची उद्या बैठक

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. मराठा मंदिर, खानापूर रोड येथे ही बैठक बोलाविण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कळविले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article