सीमा मठकर यांच्या हाती ठाकरेंची मशाल
माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
सावंतवाडी
माजी आमदार जयानंद मठकर यांच्या सुनबाई सौ.सीमा मठकर यांना प्रवेश देताना आनंद होत आहे. महाविकास आघाडीचे संपूर्ण पॅनल त्यांच्यासह निवडून येईल असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडीत मला ५ हजार मते मिळाली. पैसा नसल्याने थोडे कमी पडलो. पण, मिळालेली मते कमी नाहीत असंही त्यांनी सांगितलं. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी सीमा मठकर यांनी त्यांच्या समर्थकांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला .श्री. राऊत पुढे म्हणाले, अनेकांनी जयानंद मठकरांना गुरू मानलं. मात्र, गुरू मानायचे आणि फसवायच काम काहीजण करतात. फसवणाऱ्यांच्या विरोधात मठकर कुटुंबाला मान देणाऱ्या भगव्याचा अभिमान माजी आमदार मठकर यांना वाटत असेल असं मत त्यांनी व्यक्त केले. फसवणूक करणारे सरकार राज्यात आहे अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे सिंधुदुर्गनगरीचा कायापालट होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्यामुळे झालं. मात्र, १ हजार कोटींचा सद्उपयोग होत नाही. ठेकेदाराने १२ टक्के कमिशनसाठी आताच्या आरोग्यमंत्र्यांनी टेंडर काढले नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला. सावंतवाडीचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची केवळ टिमकी वाजवली जात आहे. सावंतवाडीचा विकास काही राजकीय प्रवृत्तीमुळे होऊ शकला नाही असं मत त्यांनी व्यक्त केले. तसेच इथले पालकमंत्री फक्त मटका अड्ड्यावर धाडी मारत आहेत. पण, धाड पडणारे म्हणतात आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत. ड्रग्सचा व्यापार त्यांना चालतो का ? दारूचे अड्डे त्यांना दिसत नाहीत का ? असा सवाल त्यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे नेण्याची सुरुवात आज सावंतवाडीतून होत आहे. सिंधुदुर्ग पोलिस दबावाला बळी पडत नाहीत यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. प्रामाणिक लोकांना दडपण्याचे प्रकार होतील. मात्र, शिवसेना तिथे उभी राहील. आज आम्ही सेनेचे उमेदवारी अर्ज भरत आहोत. कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि मनसे देखील आपल्यासह आहे. त्यांचेही अर्ज आपण दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूजाण, सुसंस्कृत पैशांपेक्षा विचारांच नेतृत्व करणाऱ्या सीमा मठकर यांच्या मशालीला साथ द्या असं आवाहन श्री. राऊत यांनी केले. याप्रसंगी शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सौ. सीमा मठकर यांच्यासह समर्थकांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह आर्या सुभेदार, कृतिका कोरगावकर, नियाज शेख, तेजल कोरगावकर, आत्माराम नाटेकर आदींनी पक्षप्रवेश केला. यावेळी उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, सुकन्या नरसुले आदींसह उमेदवार, शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी अरूण दुधवडकर म्हणाले, सावंतवाडीकरांची साथ आम्हाला आहे. सीमा मठकर यांच्यासह आमचे सर्व उमेदवारांना ते आशीर्वाद देतील. सुसंस्कृत उमेदवार निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी नगराध्यक्ष आमचाच होणार असा विश्वास व्यक्त केला. तर सेनेचा भगवा फडकावून उद्धव ठाकरे यांची शाबासकी मिळवू अस मत सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले