महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विमान पाहून जराव्याधाचा आनंद गगनात मावेना

06:35 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

भगवंत जराव्याधाला म्हणाले, जेव्हा मनुष्य इतरांचा अपराध करतो, तेव्हा त्याचे अध:पतन होते पण जर त्याने माझा अपराध केला तर त्यांची कायमची मुक्तता होते. इतरांच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. एखाद्याने माझा अपराध केला तरी मी त्याचा उद्धारच करतो. एखाद्याने विष म्हणून जरी अमृत प्यायले तरी तो अमर होतोच होतो कारण तो अमृताचा गुण आहे. त्याप्रमाणे द्वेशाने जरी एखाद्याला माझे दर्शन घडले तरी मी त्याला पवित्र करतो. मला निजधामाला जायचे होतेच. ते माझे काम तू सिद्धीस नेलेस. त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मला बाण मारण्याने तू तुझा देह पापी आहे असे तू समजतोस पण त्याच देहामुळे तू स्वर्गाचे भूषण होऊ राहशील आणि देव तुला वंदन करतील. आपण स्वर्गाचे भूषण होऊ आणि देवसुद्धा आपल्याला वंदन करतील हे भगवंताचे बोल ऐकून जराव्याध आश्चर्यचकित झाला. भगवंताच्याही ते लक्षात आले. आपल्या म्हणण्याचा अधिक खुलासा करावा म्हणून ते म्हणाले, अवतारकार्य संपवून मी निजधामी परत यावे अशी देवांची फार इच्छा होती. ती गोष्ट घडण्यासाठी तू कारणीभूत झालास. म्हणून तू स्वर्गाचे भूषण होऊन राहशील आणि देवांना वंद्य होशील. यज्ञयाग करून यज्ञ करणारे लोक पुण्य संपादन करतात आणि त्या पुण्याच्या जोरावर स्वर्गाचे सुख उपभोगतात पण त्यांचा पुण्यसाठा संपत आला की, त्यांचे पतन होते. त्यांचा पुनर्जन्म होऊन त्यांना परत पृथ्वीवर यावे लागते पण तुझं तसं नाही. तुझ्या सुखाला आता ओहोटी हा शब्द उरला नाही करण आता तू अखंड सुखी होणार आहेस. तुला माझे दर्शन घडले असल्याने तू कितीही स्वर्गसुख उपभोगलंस तरी तुझे पुण्य क्षीण होणार नाही. तेव्हा जन्ममृत्यूच्या चक्रातून तुझी सुटका झाली असल्याने आता अखंड सुख तुझ्या पायाशी लोळण घेत राहील. एव्हढं सांगून भगवंत पुढे म्हणाले, तुझा उद्धार होणार हे निश्चित आहे तेव्हा आता मनात कोणतीही शंका कुशंका आणू नकोस कारण मी सांगितलेल्या गोष्टीत मिथ्या किंवा तुझी दिशाभूल करणारे काहीही नाही. तू कायमचा संतुष्ट होणार आहेस. कदाचित तू असा विचार करत असशील की, हा तर आता निजधामाला निघाला आहे मग मला अक्षय सुख कोण देणार? आणि मी त्याबद्दल कुणाकडे याचना करू? भगवंतांनी आपल्या मनातले विचार बरोबर ओळखले हे पाहून जराव्याध चकित झाला. त्याच्या मनातील गोंधळ नाहीसा करावा म्हणून भगवंत पुढे म्हणाले, इतर लोकांप्रमाणे मी नुसत्या गोडगोड गप्पा मारणारा वाटलो का तुला? तू तसा विचार करत असशील तर तुला चूक म्हणता येणार नाही कारण बहुतांशी लोक असेच बोलतात पण माझ्यात आणि त्यांच्यात फरक आहे. त्यांच्याप्रमाणे मी नुसते बोलणारा नसून बोलल्याप्रमाणे करून दाखवणारा आहे. तुला मी बोलल्याप्रमाणे आत्तापासूनच अक्षय सुख भोगायला नक्की मिळेल. अरे माझ्या आज्ञेने ध्रुव आढळपदी विराजमान झाला आणि तो अजून तेथेच आहे. काळसुद्धा माझ्या आज्ञेत वागतो. माझ्या नजरेखाली काम करतो. मी सांगितल्याशिवाय ती रेषभरही इकडेतिकडे सरकू शकत नाही. स्वत:च्या विचाराने तो कुणाचे काहीही वाकडे करू शकत नाही. आपल्या आज्ञेचे उल्लंघन कुणीच करू शकत नाही असे श्रीकृष्णनाथ जराव्याधाला समजावून सांगत असतानाच चमत्कार घडला आणि एक मोठेच्यामोठे विमान जराव्याधाच्या जवळ येऊन उभे राहिले. परमात्म्याचा अवतार असलेल्या आणि चराचर व्यापून राहीलेल्या श्रीकृष्णनाथांना सुरासुर सदा वंदन करतात. ते लीलाविग्रहाने देहधारण करतात म्हणून त्यांना योगेश्वरही वंदन करतात. अशा अतिवरिष्ठ असलेल्या श्रीकृष्णांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे दैदिप्यमान विमान येऊन हजर झाले. भगवंत बोलल्याप्रमाणे विमान आलेले पाहून जराव्याधाचा आनंद गगनात मावेना.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article