महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशद्रोही घोषणा आणि उन्हाने तापले वातावरण

06:30 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्नाटकात गेल्या काही दिवसात विविध घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षीत यश मिळालं आहे. विधानसभेत काँग्रेसच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबादची घोषणा केल्याने पक्ष श्रेष्ठींना या साऱ्याला तोंड द्यावे लागणार आहे. दुसरीकडे बेंगळूरमधील कॅफेतील स्फोटावरुनही विरोधी पक्षाने आवाज उठवला असून तपासावर साऱ्यांचे लक्ष असणार आहे. उन्हाच्या झळा असह्या करु लागल्या असून राज्यात बेंगळूरसह अन्यत्र यंदा पाणी टंचाई बिकट होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. या साऱ्याच बाबतीत शासन यंत्रणेची तारांबळ उडणार हे नक्की.

Advertisement

गेल्या आठवड्यात राज्यसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या 3 व भाजपच्या एका उमेदवाराचा विजय झाला. अजय माकन, नासीर हुसेन, जे. सी. चंद्रशेखर हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर भाजपचे नारायणसा भांडगे यांची राज्यसभेवर निवड झाली. निकाल अपेक्षितच होता. निजदने रिंगणात उतरविलेल्या कुपेंद्र रे•ाr यांच्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. क्रॉस व्होटिंगमुळे कुपेंद्र रे•ाr विजयी होणार, अशी अटकळ होती. यासाठी प्रयत्नही सुरू होते. मात्र, कोणीही क्रॉस व्होटिंगचे धाडस केले नाही. भाजपचे माजी मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप आहे. पक्षाने त्यांच्याबरोबरच शिवराम हेब्बार यांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्याची माहिती आहे. शिवराम हेब्बार हे मतदानाला गैरहजर होते. निवडणूक निकालादिवशी लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानसभेत काँग्रेसचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य नासीर हुसेन यांचा विजयोत्सव सुरू असताना त्यांच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आहेत.

Advertisement

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्या दरम्यान भारताचा पराभव झाला तर कोठे ना कोठे तरी पाकिस्तानचा जयजयकार करण्याचे धाडस काही विघ्नसंतुष्ट दाखवत असतातच. वेगवेगळ्या गावात अशा घटना घडत होत्या. आता थेट विधानसौधमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या आहेत. लगेच समाजमाध्यमांवर व वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानचा जयजयकार करणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवा, अशी मागणी होऊ लागली. पहिल्याच दिवसापासून काँग्रेस नेत्यांनी सावध भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, नासीर हुसेन झिंदाबादच्या घोषणा दिल्या असणार, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा कोण देणार, अशी विचारणा करीत या प्रकरणावरच पांघरुण घालण्याचे प्रयत्न झाले. घोषणाबाजीची व्हिडिओ क्लिप वैज्ञानिक पृथ:करणासाठी विधिविज्ञान प्रयोगशाळेला पाठविण्यात आली. प्रयोगशाळेच्या अहवालावरून बेंगळूर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरुद्ध भाजपने आघाडीच उघडली आहे.

या प्रकारानंतर मंड्या तालुक्यातील डनायकानपुरा येथील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. 17 डिसेंबर 2022 रोजी मंड्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्यावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आता एफआयआर दाखल करून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. शत्रूराष्ट्राचा जयजयकार करणारे कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही जातीधर्माचे असो त्यांना अद्दल घडविण्याऐवजी या प्रकरणातही राजकारण केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसौधमध्ये पाकिस्तानचा जयजयकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा संदेश सर्वपक्षीय नेत्यांनी द्यायला हवा होता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेली राजकीय चढाओढ व कुरघोड्या लक्षात घेता वेगळेच चित्र पहायला मिळते. नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य नासीर हुसेन यांना त्याच दिवशी पत्रकारांनी देशविरोधी घोषणांविषयी विचारले. त्यावेळी घोषणाबाजी करणाऱ्यांचे कान पिळण्यापेक्षा पत्रकारांनाच इथून चालते व्हा, असे दरडावले.

विधिविज्ञान प्रयोगशाळेतील अहवालानंतर बेंगळूर पोलिसांनी या प्रकरणी तिघा जणांना अटक केली आहे. आता राज्यसभा सदस्य नासीर हुसेन यांनाही या प्रकरणात आरोपी करावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत नासीर हुसेन यांनी शपथ घेऊ नये, अशी मागणी करीत राज्यसभेच्या सभापतींना पत्र पाठविण्यात येणार असल्याचेही विजयेंद्र यांनी जाहीर केले आहे. पाकिस्तान झिंदाबादवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच 1 मार्च रोजी बेंगळूर येथील रामेश्वरम कॅफे येथे स्फोट झाला आहे. एनआयएने या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. विविध राज्यात गुन्हेगारांच्या शोधासाठी धाडसत्र सुरू झाले आहे. गार्डन सिटी, सिलिकॉन सिटी म्हणून ओळखल्या जाणारे बेंगळूर दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित शहर बनले आहे. रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडविणाऱ्या गुन्हेगाराची माहिती देणाऱ्यांना 10 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. विधानसभेत विजयोत्सवावेळी झालेली वादग्रस्त घोषणाबाजी, त्यानंतर लगेच झालेला स्फोट या दोन घटनांनी कर्नाटक देशभरात पुन्हा ठळक चर्चेत आले आहे.

कर्नाटकात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढला आहे. मार्चच्या सुरुवातीलाच उष्मा वाढला आहे. पावसाअभावी संपूर्ण राज्यातील नद्या-नाल्यांनी आताच तळ गाठला आहे. अजून एप्रिल आणि मे हे दोन महिने आहेत. राज्यातील 7 हजारहून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. चालू महिन्याअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उष्मा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. संपूर्ण राज्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी सरकारी यंत्रणा राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचनाच दिली आहे. कडक उन्हातच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते राज्याचा दौरा करू लागले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा हे बेळगावला आले होते. राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाली असली तरी त्यामध्ये कर्नाटकातील कोणत्याच मतदारसंघात उमेदवार जाहीर झालेला नाही.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील राजकीय संघर्ष सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सरकारचे पतन होणार, असे भाकित भाजप नेते करू लागले आहेत. 135 संख्याबळ असलेले सरकार कसे पडणार? खरोखरच ते शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नेतृत्वबदलाची चर्चा उचल खाणार आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर ईडीने दाखल केलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याच खटल्यात त्यांना 33 दिवस तिहार कारागृहात रहावे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शिवकुमार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच प्रकरणाची त्यांच्या राजकीय वाटचालीत मोठी अडचण झाली होती, जी आता दूर झाली आहे. कर्नाटकातील 28 पैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेस व भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. राज्यातील 223 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. दुष्काळ, कडक ऊन, पाण्यासाठी सुरू असलेली वणवण, उदरनिर्वाहासाठी खेड्यापाड्यातील नागरिकांचे सुरू असलेले स्थलांतर आदी पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. उष्म्याबरोबरच राजकीय वातावरण तापते आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article