Miraj : दिल्ली स्फोटानंतर मिरज रेल्वे स्थानकात सुरक्षा कडक
श्वानपथकाकडून गाड्या व प्रवाशांची कसून तपासणी
सांगली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्थानकातही सुरक्षा कडक करण्यात आली असून, पोलीस आणि श्वानपथक सतत तपासणी करत आहेत.
काल रात्रभर मिरज स्थानकावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली. प्रवाशांच्या बॅग, सुटकेस आणि सामानाचे श्वानपथकाच्या मदतीने बारकाईने परीक्षण करण्यात आले. आज सकाळपासूनही ही तपासणी अधिक काटेकोरपणे सुरू आहे.
विशेषतः दिल्लीकडून येणाऱ्या गाड्यांवर रेल्वे पोलिसांचे विशेष लक्ष असून, स्थानक परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सावध राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. सध्या मिरज स्थानक परिसरात उच्चस्तरीय सतर्कतेचा माहोल कायम आहे.