नववर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त,
प्रभारी जिल्हा पोलीसप्रमुखांची पत्रकार परिषदेत माहिती : वाहनचालकांवर नजर
प्रतिनिधी/ बेळगाव
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नववर्षाचे स्वागत करताना आगळीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यासाठी 45 तपासनाके उभारण्यात आले असून नशेत वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रे•ाr यांनी दिली.
सोमवारी आपली भेट घेतलेल्या पत्रकारांशी बोलताना त्यांनी बंदोबस्ताची माहिती दिली. प्रत्येक तपास नाक्यावर चार ते पाच अधिकारी व पोलीस तैनात असणार आहेत. त्यांच्याजवळ रिफ्लेक्टर जॅकेट, ब्रेथ अॅनॅलायझर, बॉडीवोर्न कॅमेरे असणार आहेत. तपासनाक्याजवळ झिगझॅग बॅरिकेड्स घालण्यात येणार आहेत. नशेत वाहने चालविणाऱ्यांची तपासनाक्यावरच तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. रविवारी 29 डिसेंबर रोजी नशेत वाहने चालविणाऱ्या 80 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 1 जानेवारीपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. रिसॉर्टमध्ये पार्टी आयोजित करण्यासाठी परवानगीची सक्ती आहे. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजेत. खासकरून स्विमिंगपूल असलेल्या ठिकाणी खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील बहुतेक रिसॉर्टना भेटी देऊन यासंबंधी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाच्या पाच, जिल्हा सशस्त्र दलाच्या दहा तुकड्या वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात येणार आहेत. 5 पोलीस उपअधीक्षक, 15 पोलीस निरीक्षक, 55 पोलीस उपनिरीक्षकांसह एक हजार पोलीस व हवालदार जुंपण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अशांतता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा अमरनाथ रे•ाr यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात चोऱ्या वाढल्या आहेत. थंडीच्या दिवसात चोऱ्या वाढतात. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. आमावस्या जवळ आली की अंधाराचा फायदा घेत गुन्हेगार सक्रिय होतात. गुन्हेगारी कारवाया थोपविण्यासाठी रात्रीच्या वेळी अनावश्यक फिरणाऱ्यांची फिंगरप्रिंट तपासणीची मोहीम हाती घेण्यात आल्याचे अमरनाथ रे•ाr यांनी सांगितले.