कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
मुलभूत सुरक्षा पुरविण्याकडे दुर्लक्ष : वाणिज्य दूतावासाच्या कामकाजाला ब्रेक : ट्रूडो यांचा भारताविऊद्ध धोकादायक खेळ
वृत्तसंस्था/ओटावा
कॅनडात खलिस्तान समर्थकांना मोकळे रान दिल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या भारतीय राजनैतिक मिशनची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे टोरोंटो येथील भारतीय वाणिज्य दुतावासाला आपले कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. कॅनडातील सुरक्षा अधिकारी किमान सुरक्षा प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यानंतर काही नियोजित वाणिज्य दूतावास कॅम्प रद्द करण्यात आल्याची माहिती टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने गुरुवारी दिली.
समुदाय शिबिराच्या आयोजकांना किमान सुरक्षा प्रदान करण्यात सुरक्षा एजन्सींच्या अक्षमतेच्या पार्श्वभूमीवर, वाणिज्य दूतावासाने काही नियोजित वाणिज्य दूतावास शिबिरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारतीय वाणिज्य दूतावास पोस्टने म्हटले आहे. भारतविरोधी अतिरेक्यांनी म्हणजेच खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर वाणिज्य दूतावासाने ही घोषणा केली आहे. एकंदरीत, भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव वाढताना दिसत आहे.
दूतावास कार्यक्रमावर खलिस्तानी हल्ला
भारतीय वाणिज्य दूतावासाने टोरंटोजवळील ब्रॅम्प्टनमधील हिंदी सभा मंदिराबाहेर कॉन्सुलर कॅम्प आयोजित केला होता. यावेळी खलिस्तान समर्थक फुटिरतावाद्यांनी घुसून हल्ला केला होता. वाणिज्य दूतावासाच्या कार्यक्रमावर झालेल्या हल्ल्याबाबत भारताने सर्वोच्च स्तरावर तीव्र निषेध नोंदवला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला ‘जाणूनबुजून केलेला हल्ला’ म्हणत आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच अशाप्रकारचे हल्ले भारताच्या राजनैतिक मिशनचे इरादे कमकुवत करू शकणार नाहीत, असे म्हटले होते. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी ब्रॅम्प्टनमधील हिंसक हल्ल्याबाबत निवेदन जारी करून त्याचा निषेध केला होता.