For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पंतप्रधान मोदी साऱ्या जगाला प्रिय’

07:00 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘पंतप्रधान मोदी साऱ्या जगाला प्रिय’
Advertisement

डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून प्रशंसा, अमेरिकेत सत्तांतराच्या प्रक्रियेचा प्रारंभ, मंत्रिमंडळाकडे लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साऱ्या जगाला प्रिय असणारे व्यक्तीमत्व आहे,’ अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांचा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले होते. बुधवारी रात्री उशीरा त्यांनी ट्रंप यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद करताना ट्रंप यांनी त्यांचे कौतुक केले. दोन्ही नेत्यांनी शांतता, आर्थिक सहकार्य आणि धोरणात्मक भागिदारी आदी विषयांवर चर्चा केल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती ‘एक्स’ या माध्यमावरही प्रसारित केली आहे. जागतिक शांततेसाठी आपण दोघेही एकत्रितरित्या काम करु, असे प्रतिपादन ट्रंप यांनी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारत हा एक महान देश आहे आणि या देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महान आहेत, असे भावोत्कट उद्गार ट्रंप यांनी या संवादात काढल्याचा उल्लेखही ‘एक्स’ करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी, भारत माझे खरे मित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यातील घनिष्ट संबंधांचा प्रत्यय या दूरध्वनी संवादातून आला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे माझे खरे मित्र आहेत. निवडणुकीत माझा विजय झाल्यानंतर ज्या जागतिक नेत्यांशी मी प्रथम संवाद साधला त्यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश आहे. भारताशी अमेरिकेची मैत्री आता अधिक दृढ होईल, असेही उद्गार त्यांनी काढल्याचे समजते.

अमेरिकेशी भागीदारी दृढ होणार

भारत आणि अमेरिका यांच्यात तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये दृढ भागीदारी स्थापन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. जगात शांतता, स्थिरता आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी एकत्र कार्य करण्याची इच्छा ट्रंप यांनी व्यक्त केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केली आहे.

सत्तांतरासाठी अमेरिका सज्ज

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांचा विजय झाल्यानंतर आता त्या देशात सत्तांतराची लगबग होत आहे. मतगणनेपासून 75 दिवसांनंतर, अर्थात येत्या 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रंप अमेरिकेच्या अध्यक्षपदाची रितसर शपथ घेतली आणि त्यांच्या द्वितीय कार्यकाळाला प्रारंभ होईल. ते आपल्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करतात, याकडे आता भारतासह जगाचे लक्ष लागले आहे.

प्रशासनात भारतीयांचा समावेश शक्य

ट्रंप यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या नेत्याचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, विविध प्रशासकीय पदांवर भारतीय वंशाच्या तज्ञ नागरीकांची नियुक्ती केली जाऊ शकते. ट्रंप यांच्या या दुसऱ्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकेचे संबंध संरक्षण आणि तंत्रज्ञान आदानप्रदान या क्षेत्रांमध्ये अधिक दृढ होऊ शकतात, असे तज्ञांचे मत आहे. आयात-निर्यात कर, व्यापारी तुटीचा समतोल, आदी मुद्द्यांवर दोन्ही देशांचे मतभेदही होण्याची शक्यता आहे. तरीही चीन आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात ट्रंप यांची भूमिका भारतासाठी अधिक अनुकूल असल्याची शक्यता असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

सत्तांतराची प्रक्रिया कशी असते...

निवडून आल्यानंतर त्वरित पदभार स्वीकारला जात नाही. अमेरिकेच्या नियमांच्या अनुसार निवडणुकीनंतर जवळपास अडीच महिन्यांनी 20 जानेवारीला नवे अध्यक्ष शपथग्रहण करतात. त्यांच्यासह उपाध्यक्षही शपथग्रहण करतात. मधल्या काळात भावी अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी नव्या प्रशासनाच्या रचनेचा विचार करतात. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची निवड केली जाते. तसेच विविध प्रशासकीय पदे, इतकेच नव्हे, तर न्यायाधीशांच्या पदांवरही भावी अध्यक्ष त्यांच्या इच्छेनुसार व्यक्तींची निवड करु शकतात. अमेरिकेचे संरक्षण, विदेश व्यवहार, आर्थिक धोरण आणि प्रशासकीय प्राधान्याची क्षेत्रेही निवडली जातात. भावी अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना त्वरित कामाला प्रारंभ करता यावा, यासाठी जी पूर्वसज्जता लागते, ती करण्यासाठी हा अडीच महिन्यांचा कालावधी उपयोगात आणला जातो.

पराभव मान्य, पण संघर्ष करुच

बुधवारी रात्री उशीरा डेमॉव्रेटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रंप यांचे दूरध्वनीवरुन अभिनंदन केले. मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेन, माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि इतर मान्यवरांनीही ट्रंप यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. मात्र मूल्याधारित संघर्ष यापुढेही केला जाईल, असे प्रतिपादन हॅरिस यांनी केले. तसेच सत्तांतर सुरळीत करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही दिले.

ट्रंपविजयाचे जगभर पडसाद

  • डोनाल्ड ट्रंप यांच्या विजयाची जगभरात होत आहे साधक-बाधक चर्चा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवादात ट्रंप यांच्याकडून भारताची प्रशंसा
  • डोनाल्ड ट्रंप यांना प्रथेप्रमाणे 20 जानेवारीला दिली जाणार पदाची शपथ
Advertisement
Tags :

.