काश्मीरमध्ये 20 नेत्यांची सुरक्षा हटविली
फारुख अब्दुल्लांच्या नातेवाईकाचा समावेश
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये 20 राजकीय नेत्यांची सुरक्षा हटविण्यात आली आहे. तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांकरता तैनात सुरक्षा कर्मचाऱयांसह एस्कोर्ट सुविधाही मागे घेण्यात आली आहे. यातील बहुतांश नेते हे माजी आमदार तर एक माजी खासदार आहे.
माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे जावई तसेच जेअँडके सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे संचालक मोहम्मद असीम खान यांची सुरक्षा हटविण्यात आली आहे. अनेक नेत्यांच्या सुरक्षेकरता तैनात जवानांची संख्या कमी करण्यात आली आहे. सुरक्षा हटविण्यात आलेल्यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी नेत्यांचा समावेश आहे.
या राजकीय नेत्यांकडे दीर्घकाळापासून जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि एसएसबीची सुरक्षा होती.पीर अफाक अहमद, अली मोहम्मद डार, गुलाम नबी भट्ट, मीर सैफुल्लाह, चौधरी मोहम्मद रमजान, जी. एस. ओबेरॉय, मुबारक गुल, अली मोहम्मद सागर, कैसर अहमद लोन, तन्वीर सादिक, मुश्ताक अहमद शाह, मुजफ्फर हुसैन बेग, सरताज अहमद मदानी, नाजिर अहमद खान, पीरजादा गुलाम अहमद शाह, मंजूर अहमद वाणी, गुलाम नबी शाहीन, शेख अहमद सलूरा यांना प्रदान करण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली आहे.