युद्धविरामानंतर युक्रेनला 26 देशांची सुरक्षाहमी
सुरक्षा हमीसंबंधी पॅरिसमध्ये बैठक : युरोपीय नेत्यांची विटकॉफ यांच्याशी चर्चा
वृत्तसंस्था/ पॅरिस
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की आणि युरोपीय नेत्यांनी पॅरिसमध्ये अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नियुक्त विशेष प्रतिनिधी स्टीव विटकॉफ यांच्यासोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत युद्धग्रस्त युक्रेनसाठी सुरक्षा हमीवर चर्चा करण्यात आली. युद्धविरामानंतर युक्रेनमध्ये स्वत:चे सैनिक तैनात करण्यासाठी 26 देश तयार असल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले आहे. ही बैठक युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यांदरम्यान झाली आहे. रशियाच्या वायुदलाने गुरुवारी रात्री युक्रेनमध्ये 112 ड्रोन्सद्वारे हल्ले केले. यातील 84 ड्रोन्स युक्रेनने आकाशातच नष्ट केले आहेत.
युद्धविरामाच्या स्थितीवर चर्चा
झेलेंस्की आणि विटकॉफ यांच्यात स्वतंत्र बैठकही झाली आहे. ट्रम्प यांच्या विशेष प्रतिनिधीने युद्धविरामाच्या स्थितीत युक्रेनसाठी सहाय्यासोबत सैन्य समर्थनाच्या योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी युरोपीय नेत्यांची बैठक बोलाविली होती. युक्रेनच्या समर्थनार्थ आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी युक्रेनमध्ये कुठल्याही युरोपीय सैन्यदलाच उपस्थितीसाठी अमेरिकेच्या समर्थनाची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे.
आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल
रशियासोबत शांतता करार झाल्याच्या स्थितीत युक्रेनसाठी सुरक्षा हमीच्या अंतर्गत 26 देश एका आंतरराष्ट्रीय दलात सामील होण्यास तयार आहेत अी माहिती मॅक्रॉन यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर जर्मनीने युक्रेच्या सैन्यदलासाठी वित्तसहाय्य आणि प्रशिक्षण वाढविण्यास सहमती दर्शविली आहे.
रशियाकडून कच्चे तेल खरेदी नको
युरोपने रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाची खरेदी बंद करावी, कारण याच्या माध्यमातून रशियाला युक्रेनच्या विरोधातील युद्धासाठी निधी उभारण्यास मदत मिळत असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तर दुसरीकडे त्यांनी रशिया आणि युक्रेनदरम्यान शांतता करारासाठी प्रतिबद्ध असल्याचे वक्तव्य केले आहे.