For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहलगाम हल्लाप्रकरणी सुरक्षा दलाला मोठे यश

06:11 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
पहलगाम हल्लाप्रकरणी सुरक्षा दलाला मोठे यश
Advertisement

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या शिक्षकाला अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

पहलगाम हल्ल्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी जम्मू काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्या एका दहशतवादी मदतनीसाला पोलिसांनी अटक केली आहे. सदर दहशतवाद्याचे नाव मोहम्मद युसूफ कटारिया असे असून तो पेशाने शिक्षक आहे. तसेच तो लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय सदस्य असल्याचेही चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

संबंधित आरोपीला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान पोलिसांना संशय आल्याने बुधवारी त्याला अटक केली. कटारियाने दहशतवाद्यांना मदत केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ‘ऑपरेशन महादेव’नंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील ही पहिली मोठी अटक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मोहम्मद युसूफ कटारियाच्या अटकेमुळे नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग उघड होईल असा पोलिसांना विश्वास आहे.

शस्त्रास्त्रांच्या तपासावेळी पोलिसांना संशय

सुरक्षा दलाने अलिकडेच राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’मध्ये मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांकडून जप्त केलेली उपकरणे आणि शस्त्रs तपासताना पोलिसांनी कटारियाला शोधून काढले. त्यानंतर सुरक्षा अधिकारी सातत्याने त्याच्यावर नजर ठेवून होते. अखेरीस गेल्या दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतल्यानंतर  त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत पहलगाम हल्ल्यातील सहभागासंबंधी धागेदोरे सापडताच अटकेची कारवाई करण्यात आली. ‘ऑपरेशन महादेव’ मोहिमेत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सुलेमान उर्फ फैसल, अफगाणी आणि जिब्रान अशी त्यांची नावे होती. हे सर्व लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंधित दहशतवादी होते.

Advertisement
Tags :

.