दुसरी टी-20 आज, भारत आघाडी वाढविण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ गकेबरहा
भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी टी-20 लढत आज रविवारी येथे होणार असून यावेळी संजू सॅमसन गोलंदाजांवरील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा तर भारतीय संघ आपली आघाडी वाढविण्याचा प्रयत्न करेल. मात्र भारताच्या वरच्या फळीला अधिक स्थिरता आवश्यक आहे. सॅमसनच्या 50 चेंडूंत 107 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने मालिकेच्या पहिल्या सामन्यात 61 धावांनी विजय मिळवला, परंतु इतर प्रमुख फलंदाजांकडून धावा न होणे ही पाहुण्यांसाठी चिंतेची बाब आहे.
फॉर्ममध्ये असलेल्या सॅमसनवर जास्त भार पडू नये यासाठी भारताने या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. खास करून अनेक संधी वाया घालविणाऱ्या सलामीवीर अभिषेक शर्माचे सततचे अपयश संघ व्यवस्थापनाला चिंतेचे ठरेल. या डावखुऱ्या फलंदाजाचा सातत्याचा अभाव भारताला त्यांच्यापुढील पर्यायांचा पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करू शकतो. तिलक वर्माने पहिल्या सामन्यात केवळ 18 चेंडूंत 33 धावा केलेल्या असल्या, तरी त्याला अशा डावांचे मोठ्या खेळींमध्ये रूपांतर करावे लागेल.
कर्णधार सूर्यकुमार यादवनेही चांगली सुऊवात केली होती, पण तो स्वस्तात बाद झाला, तर अष्टपैलू हार्दिक पंड्या सलामीच्या सामन्यात त्याच्या क्षमतेला जागू शकला नाही. कागदावर भक्कम दिसणाऱ्या भारताच्या मधल्या फळीला संघर्ष करावा लागून त्यांनी अवघ्या 36 धावांत सहा फलंदाज गमावले. यामुळे भारताच्या मधल्या आणि तळाकडच्या फळीचा कमकुवतपणा अधोरेखित झाला. गोलंदाजीच्या बाबतीत वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई या दोन फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केलेली असून अर्शदीप सिंग आणि आवेश खान या भारताच्या वेगवान जोडीनेही आपली भूमिका चोख बजावलेली आहे.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा, एन्रिक नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी यासारख्या प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती जाणवत आहे. विंडीजकडून 0-3 असा पराभव पत्करलेल्या आणि आयर्लंडविऊद्धची मालिका अनिर्णित राहिलेल्या यजमान संघाला कर्णधार एडन मार्करम, डेव्हिड मिलर व हेन्रिक क्लासेनसह वरिष्ठ खेळाडूंकडून सुधारित कामगिरीची आवश्यकता आहे.
संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका: एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोन्गवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले सिमेलेन, लुथो सिपाम्ला (तिसरा आणि चौथा टी-20), ट्रिस्टन स्टब्स.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.