दुसरी ‘टी20’ लढत आज
भारतीय गोलंदाजांकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था/ तिऊवनंतपुरम
भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील दुसरी लढत आज रविवारी होणार असून त्यात युवा भारतीय गोलंदाजी विभागाला मालिकेच्या सुऊवातीच्या सामन्यातील खराब प्रदर्शनाला विसरून ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा धावांचा ओघ रोखून दाखवावा लागेल. भारताने विशाखापट्टणम येथे झालेला पहिला सामना दोन गडी राखून जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. परंतु त्या सामन्यात वेगवान गोलंदाज मुकेश कुमार वगळता इतर गोलंदाज धावांचा ओघ रोखण्यास असमर्थ दिसले.
येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील खेळपट्टी आणि परिस्थिती त्याहून फारशी वेगळी असणार नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना एकत्रितपणे प्रभावी मारा करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. असे असले, तरी संघ व्यवस्थापन या सामन्यासाठी संघरचनेत बदल करण्याची शक्यता कमीच आहे. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी अनुक्रमे प्रति षटक 10.25 आणि 12.50 धावा दिल्या, तर लेगस्पिनर रवी बिश्नोई प्रति षटक 13.50 धावा इतका महाग ठरला.
‘टी20’मध्ये गोलंदाजी महाग ठरणे हे असामान्य दृश्य नाही, परंतु पहिल्या सामन्यात तीन गोलंदाजांच्या बाबतीत कल्पकता आणि विविधता यांची कमतरता दिसून आली. मालिकेत आघाडी वाढविण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आज गोलंदाज आपल्या कामगिरीत कशी लक्षणीय सुधारणा करतात त्यावरही बरीच अवलंबून असेल. मुकेशने हे अशक्यप्राय काम नाही हे दाखवून दिलेले आहे. त्याने गोलंदाजीत वैविध्य राखताना यॉर्कर्स, बाउन्सर, ऑफ स्टंपच्या किंचित बाहेरचे चेंडू यांची सरमिसळ चांगल्या पद्धतीने केली. त्यामुळे इतर आघाडीचे गोलंदाज आज त्यापासून धडा घेऊ शकतात.
गोलंदाजांच्या बाबतीत हे खरे आहे की, त्यातील बरेच जण बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अव्वल स्तरावरील क्रिकेट खेळत होते. परंतु आजकालच्या वेळापत्रकाचे स्वरूप पाहता खेळाडूंनी त्यांना उपलब्ध होणाऱ्या पहिल्या संधीत सर्वोत्तम कामगिरी करून दाखविणे आवश्यक असते. विशेषत: बिश्नोईसारख्या खेळाडूच्या संदर्भात ते लागू होते. कारण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुढे जाऊ शकणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. परंतु विझागमध्ये त्याने निराशा केली आणि जोश इंग्लिसने त्याच्याविरूद्ध आक्रमक भूमिका घेतल्यावर तो निप्रभ दिसला. बिश्नोईला हे लक्षात घ्यावे लागेल की, प्रभाव पाडण्यासाठी नुसता गुगलीचा मारा करण्यावर तो अवलंबून राहू शकत नाही.
प्रसिद्ध कृष्णाने देखील तितकीच निराशा केली. कारण तो अलीकडेच भारताच्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग होता आणि त्याला सराव करताना आघाडीच्या खेळाडू व प्रशिक्षकांसमवेत वावरण्याची संधी मिळाली होती. तथापि, त्याच्या गोलंदाजीत त्या प्रभावाचा मागमूस दिसून आला नाही. कारण खेळपट्टीवर चेंडू उसळविण्याच्या त्याच्या प्रयत्नांना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी निष्फळ ठरविले. &ंदुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन, रिंकू सिंग आणि यशस्वी जैस्वाल यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांविऊद्ध चांगली कामगिरी केलेली असल्याने भारताला फलंदाजीच्या बाबतीत फारशा तक्रारी नाहीत.
जरी किशनने फटकेबाजी सुरू करण्यापूर्वी स्थिर होण्यासाठी काही षटके घेतलेली असली, तरी सूर्यकुमार, रिंकू आणि जैस्वाल यांनी मोठे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने जलदरीत्या धावा काढण्याची गरज सहज पूर्ण केली. भारताला आज दुसऱ्या सामन्यातही त्यांच्याकडून अशाच धडाकेबाज कामगिरीची आणि किशनकडून कमी चेंडू वाया घालविण्याची अपेक्षा असेल. सलामीच्या सामन्यात 19 चेंडूंत 21 धावा केल्यानंतर किशन डावाचा वेग वाढवू शकला होता. पण या सामन्यात त्याची पुनरावृत्ती टाळण्याकडे त्याचा कल राहील. मागील सामन्यात धावबाद झालेला ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा हेही अधिक चांगली खेळी करू पाहतील.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यातील काही सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करेल. इंग्लिसचे शतक हे त्याचे सलामीवीर म्हणून सर्व प्रकारांतील पहिले शतक असून त्यामुळे त्यांना दिलासा मिळालेला असेल. पण स्टीव्ह स्मिथला सलामीवीर म्हणून बढती देण्याची चाल अपेक्षित परिणाम साध्य करू शकलेली नाही. त्याने 41 चेंडूंत 52 धावा केल्या खऱ्या, परंतु त्यासाठी त्याला बरेच धडपडावे लागले. जेसन बेहरेनडॉर्फ वगळता भारतीय गोलंदाजांप्रमाणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजही सूर्यकुमार आणि इतर फलंदाजांना वेसण घालू शकले नाहीत. त्यामुळे आज ऑस्ट्रेलियन संघ तन्वीर संघाच्या जागी लेगस्पिनर अॅडम झॅम्पाला संधी देऊ शकतो.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरोन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7 वा.