भारतीय - इंग्लिश महिला संघांची आज दुसरी टी-20
वृत्तसंस्था/ ब्रिस्टल
इंग्लंडविऊद्ध आज मंगळवारी येथे होणाऱ्या दुसऱ्या महिला टी-20 मध्ये सलामीवीर स्मृती मंधानाच्या उत्कृष्ट फॉर्मचा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या उपलब्धतेचा फायदा घेऊन आणखी एक मोठा विजय मिळवण्याच्या दृष्टीने भारताचा प्रयत्न राहील. नॉटिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात मंधानाच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिल्या शतकामुळे भारताला 97 धावांचा मोठा विजय मिळाला होता.
सराव सामन्यात डोक्याला झालेल्या दुखापतीनंतर सावधगिरीचा उपाय म्हणून पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या कर्णधार हरमनप्रीतची उपस्थिती आज यजमानांच्या चिंतेत आणखी भर घालेल. 210 धावांचा पाठलाग करताना झालेल्या नाट्यामय फलंदाजीच्या पतनाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्लंडच्या छावणीत मानधनाच्या फटकेबाजीमुळे व शतकामुळे धोक्याची घंटा वाजली आहे. त्या दिवशी मानधनाचा खेळीमुळे यजमानांवर प्रचंड दबाव आला, ज्याचा नंतर भारतीय गोलंदाजांनी फायदा घेतला.
भारताने सुऊवातीला दोन बळी मिळविले आणि फिरकी गोलंदाज, विशेषत: डावखुरी फिरकी गोलंदाज श्रीचरणी हिने तिच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये चार बळी घेत इंग्लंडचा डाव उद्धवस्त करण्याचे काम पूर्ण केले. गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील धावांच्या यादीत आघाडीवर राहिलेल्या मानधनाने सर्व इंग्लिश गोलंदाजांना निर्भयपणे फटकावले. या डावखुऱ्या फलंदाजाने सामन्यानंतर सांगितले की, टी-20 स्वरूप हे तिचे बलस्थान नाही. परंतु क्रिकेट जगत त्याकडे उपहासाने केलेली टिपणी अशाच नजरेने पाहील.
त्या सामन्यात भारताच्या उपकर्णधाराची पॉवर-हिटिंग क्षमता पूर्णपणे प्रदर्शित झाली. कारण तिने ऑफ-साईडवर तिच्या बहुतेक चौकारांची नोंद केली, तर तिच्या तीन षटकारांची नोंद ऑन-साईडला झाली. बेंगळूरमधील दीर्घ शिबिरानंतर इंग्लंडमध्ये झालेले लवकर आगमन आणि काही सराव सामन्यांमुळे भारतीय खेळाडूंना क्रिकेटच्या या सर्वांत लहान स्वरूपात लयीत येण्यास मदत झाली आहे, असे दिसते. कारण नॉटिंगहॅममध्ये त्यांच्यात सुस्तीची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. दुखापतींनी ग्रस्त रेणुका सिंह ठाकूर आणि पूजा वस्त्रकार या त्यांच्या आघाडीच्या गोलंदाजांच्या अनुपस्थितीतही भारत एक चांगला संघ दिसला.
तिसऱ्या क्रमांकावरील हरलीन देओलने तिची निवड सार्थ ठरविताना मानधनासोबत दुसऱ्या गड्यासाठी 94 धावांची भागीदारी करून मोठी धावसंख्या उभारण्याकामी मोलाची मदत केली. या द्विपक्षीय मालिकेचे तत्काळ परिणाम होणार नसले, तरी पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात काय घडणार याची कल्पना युवा भारतीय खेळाडूंना नक्कीच येईल. त्यादृष्टीने विचार करता पदार्पण करणाऱ्या 20 वर्षीय श्रीचरणीने तिच्या पहिल्या सामन्यात खरोखरच चांगली कामगिरी केली. 3.5 षटकात 12 धावा देऊन 4 बळी असा स्वप्नवत स्पेल टाकून इंग्लंडच्या फलंदाजीचे आव्हान संपविण्यात तिने मोलाचा वाटा उचलला आणि भारताचा विजय निश्चित केला. इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट (66 धावा) हिनेच तेवढी एकाकी झुंज दिली. भारतीय फिरकीपटूंनी सहज इंग्लिश फलंदाजीचे आव्हान मोडीत काढून दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले.
सामन्याची वेळ : रात्री 11 वा.