For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय

06:30 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय

दिल्ली कॅपिटल्सवर 12 धावांनी मात, रियान परागचे नाबाद अर्धशतक, चहल-बर्गरचा भेदक मारा, स्टब्सचे प्रयत्न अपुरे

Advertisement

वृत्तसंस्था /जयपूर

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या 9 व्या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय नोंदविला. स्पर्धेच्या गुणतक्त्यात चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनी समान 4 गुण मिळविले असले तरी सरस धावगतीवर चेन्नई पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले. रियान पराग आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या समयोचित फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 5 बाद 185 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 173 धावा जमविल्या. या सामन्यात रियान परागने शेवटच्या षटकातील घेतलेल्या 25 धावा निर्णायक ठरल्या.

Advertisement

वॉर्नर आणि मार्श या सलामीच्या जोडीने दिल्लीच्या डावाला चांगली सुरूवात करून देताना 20 चेंडूत 30 धावा झोडपल्या. राजस्थानच्या बर्गरने मार्शचा त्रिफळा उडविला. त्याने 12 चेंडूत 5 चौकारासह 23 धावा जमविल्या. बर्गरने या षटकातील चौथ्या चेंडूवर रिकी भुईला यष्टीरक्षक सॅमसनकरवी झेलबाद केले. भुईला खातेही उघडता आले नाही. वॉर्नर आणि कर्णधार पंत यांनी तिसऱ्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केली. आवेश खानच्या गोलंदाजीवर वॉर्नर शर्माकरवी झेलबाद झाला. त्याने 34 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 49 धावा जमविल्या. चहलने यानंतर कर्णधार पंतला सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 26 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 28 धावा जमविल्या. चहलने दिल्लीला आणखी एक धक्का देताना पोरेलला बटलरकरवी झेलबाद केले. त्याने 9 धावा जमविल्या. दिल्लीची स्थिती यावेळी 15.3 षटकात 5 बाद 122 अशी होती.

Advertisement

अक्षर पटेल आणि स्टब्ज यांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. पण दिल्लीच्या डावातील शेवटचे षटक आवेश खानने टाकले. आणि या षटकात दिल्लीला विजयासाठी 17 धावांची गरज होती. पण आवेश खानने या षटकात केवळ 4 धावा दिल्याने दिल्लीला हा सामना गमवावा लागला. स्टब्जने 23 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 44 तर अक्षर पटेलने 13 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 15 धावा जमविल्या. दिल्लीला अवांतराच्या रूपात 5 धावा मिळाल्या. दिल्लीच्या डावामध्ये 7 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. दिल्लीने पॉवरप्लेच्या 6 षटकात 59 धावा जमविताना 2 गडी गमविले. दिल्लीचे अर्धशतक 31 चेंडूत, शतक 73 चेंडूत तर दीडशतक 104 चेंडूत फलकावर लागले. राजस्थानतर्फे बर्गर, यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 तर आवेश खानने 1 गडी बाद केला.

तत्पूर्वी या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. सलामीचा यशस्वी जैस्वाल दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. मुकेशकुमारने त्याचा त्रिफळा उडविला. जैस्वालने 7 चेंडूत 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. खलील अहमदने कर्णधार संजू सॅमसनला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 3 चौकारासह 15 धावा जमविल्या. कुलदीप यादवच्या फिरकीवर सलामीचा बटलर पायचित झाला. त्याने 16 चेंडूत 11 धावा केल्या. राजस्थानची यावेळी स्थिती 3 बाद 36 अशी होती. रियान पराग आणि रवीचंद्रन अश्विन यांनी चौथ्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी करीत डाव सावरला. अक्षर पटेलने अश्विनला झेलबाद केले. त्यांने 19 चेंडूत 3 षटकारासह 29 धावा जमविल्या. अश्विन बाद झाल्यानंतर परागला ज्युरेलकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने 52 धावांची भर घातली. नॉर्त्जेच्या गोलंदाजीवर ज्युरेलचा त्रिफळा उडाला. त्याने 12 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या.

रियान पराग आणि हेटमायर यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 43 धावांची भागीदारी केल्याने राजस्थान संघाला 185 धावापर्यंत मजल मारता आली. या खेळातील शेवटच्या षटकात रियान परागने 25 धावा झोडपल्या, त्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. राजस्थानच्या डावामध्ये 10 षटकार आणि 15 चौकार नेंदविले गेले. रियान परागने 45 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 84 तर हेटमायरने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 14 धावा फटकावल्या. राजस्थानला अवांतराच्या रूपात 7 धावा मिळाल्या.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स 20 षटकात 5 बाद 185 (जैस्वाल 5, बटलर 11, सॅमसन 15, रियान पराग नाबाद 84, आर. अश्विन 29, ज्युरेल 20, हेटमायर नाबाद 14, अवांतर 7, खलिद अहमद, मुकेश कुमार, नॉर्त्जे, अक्षर पटेल, कुलदीप यादव प्रत्येकी 1 बळी.)

दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 5 बाद 173 (वॉर्नर 49, मिचेल मार्श 23, भुई 0, पंत 28, स्टब्ज नाबाद 44, पोरेल 9, अक्षर पटेल नाबाद 15, अवांतर 5, बर्गर 2-29, चहल 2-19, आवेश खान 1-29).

Advertisement
Tags :
×

.