महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय

06:54 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अष्टपैलू अमेलिया सामनावीर, हरमनप्रीतची विजयी खेळी, शबनिमचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

अमेलिया केरची अष्टपैलू कामगिरी, शबनिम इस्माईलची भेदक गोलंदाजी व कर्णधार हरमनप्रीतची समयोचित फलंदाजी यांच्या बळावर मुंबई इंडियन्स महिला संघाने दुसऱ्या महिला प्रिमियर लीगमध्ये सलग दुसरा विजय मिळविला. गुजरात टायटन्स महिला संघावर त्यांनी पाच गड्यांनी विजय मिळविला.

अमेलिया केरने भेदक लेगस्पिनवर 17 धावांत 4 बळी मिळविले. शबनिम इस्माईलने 18 धावांत 3 बळी मिळवित तिला उत्तम साथ दिल्यामुळे मुंबईने गुजरातला 20 षटकांत 9 बाद 126 धावांवर रोखले. त्यानंतर केरने फलंदाजीत 25 चेंडूत 31 धावा करीत हरमनप्रीतला चांगली साथ दिल्यामुळे मुंबईला 18.1 षटकांत विजयाचे उद्दिष्ट गाठता आले. मुंबईची स्थिती चौथ्या षटकात 2 बाद 21 अशी झाली होती. पण केर व हरमनप्रीत यांनी चौथ्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी करीत संघाचा विजय सोपा केला. हरमनप्रीतने षटकार ठोकत विजय साजरा केला. तिने 41 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह नाबाद 46 धावा जमविल्या. याशिवाय नॅट सिव्हर ब्रंटनेही उपयुक्त खेळी करताना 18 चेंडूत 22 धावा फटकावल्या. तिने यष्टीमागे स्कूपचे अप्रतिम फटके मारत चौकार वसूल केले. ब्रंट धावचीत झाल्यानंतर मुंबईची स्थिती 3 बाद 49 अशी झाली होती. पण नंतर हरमनप्रीत व केर यांनी डाव सावरणारी भागीदारी केली. आव्हान फार मोठे नसल्याने या दोघी एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर भर देत धावफलक हलता ठेवला होता.

तत्पूर्वी, केर व शबनिम यांच्या अचूक माऱ्यापुढे गुजरात टायटन्सला 20 षटकांत 9 बाद 126 धावांपर्यंत मजल मारता आली. शबनिम निवृत्त झाली असली तरी तिची भेदकता अजूनही कमी झालेली नाही. पॉवरप्लेमध्येच तिला गोलंदाजी मिळाली. त्यात तिने वेदा कृष्णमूर्ती व हरलीन देओलचे बळी मिळविले. सहाव्या षटकात पेसर ब्रंटने फोबी लिचफील्डला बाद केले. पॉवरप्लेमध्ये त्यांनी 3 बाद 43 धावा जमविल्या होत्या. यानंतर गुजरातचे बळी ठरावीक अंतराने बाद होते गेले. बेथ मुनीने टिकाव धरला होता. पण रिव्हर्स स्वीप करताना ती 24 धावा काढून बाद झाली. 11 षटकांत 5 बाद 58 अशी गुजरातची स्थिती होती. मात्र नंतर आठव्या गड्यासाठी कॅथरिन ब्राईस (नाबाद 25) व तनुजा कंवर (28) यांनी 48 धावांची भागीदारी केल्याने गुजरातला सव्वाशेची मजल मारता आली. आज सोमवारी दिल्ली कॅपिटल्स व यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकांत 9 बाद 126 : बेथ मुनी 22 चेंडूत 24, अॅश्ले गार्डनर 15, कॅथरिन ब्राईस 24 चेंडूत नाबाद 25, तनुजा कंवर 21 चेंडूत 28, अवांतर 16. अमेलिया केर 4-17, शबनिम इस्माईल 3-18. मुंबई इंडियन्स 18.1 षटकांत 5 बाद 129 : नॅट सिव्हर ब्रंट 18 चेंडूत 22, यास्तिका भाटिया व हेली मॅथ्यूज प्रत्येकी 7, हरमनप्रीत कौर 41 चेंडूत नाबाद 46, अमेलिया केर 25 चेंडूत 31, अवांतर 15, तनुजा कंवर 2-21, ब्राईस 1-22, ताहुहू 1-17.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article