पाकिस्तानात 4 दिवसांत दुसरा हल्ला
20 जणांचा मृत्यू : बलुचिस्तानातील कोळसा खाण लक्ष्य
वृत्तसंस्था/ क्वेटा
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी एका खासगी कोळसा खाणीवर एका सशस्त्र संघटनेने केलेल्या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला तर 7 जखमी झाले आहेत. डुकी क्षेत्रातील जुनैद कोल कंपनीच्या खाणीला लक्ष्य करण्यात आले आहे.
हल्लेखोरांनी रॉकेट आणि हँडग्रेनेड समवेत आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला आहे. हल्लेखोरांनी 10 कोल इंजिन्स आणि मशीन्सना पेटवून दिले आहे. हल्ल्यात मारले गेलेले लोक हे पाकिस्तानच्या विविध भागांमधील आहेत. यातील काही जण अफगाणिस्तानचे नागरिक देखील असल्याची माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
हल्ल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत कुठल्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हल्ल्यानंतर डूकीमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने देखील सुरू झाली आहेत.
हल्लेखोरांनी खाणीत काम करणाऱ्या सर्व कामगारांना एकत्र आणत गोळ्या घातल्या आहेत. पाकिस्तानात मागील 4 दिवसांमध्ये झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 6 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा कराची विमानतळानजीक स्फोट झाला होता. यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये चिनी नागरिकांचा समावेश होता.