हमासच्या भुयारांमध्ये सोडणार समुद्राचे पाणी
वृत्तसंस्था / जेरुसलेम
गाझा पट्टीत हमासने तयार केलेल्या शेकडो किलोमीटर लांबीच्या भुयारांमध्ये समुद्राचे पाणी सोडण्याची तयारी इस्रायलने केली आहे. मिनिटाला हजारो लीटर पाणी सोडण्यासाठी शक्तीशाली मोटारींचा उपयोग केला जाणार आहे. या पाण्यामुळे ही भुयारे कायमची निकामी करण्याची इस्रायलची योजना आहे. आतापर्यंतच्या कारवाईत हमासचे 5 हजारांहून अधिक दहशतवादी ठार केल्याचे प्रतिपादन इस्रायलच्या सेनेकडून करण्यात आले असून नागरीकांना कमीत कमी त्रास होईल, अशा प्रकारे कारवाई होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
गाझापट्टीचा उत्तर भाग आता इस्रायलच्या जवळपास ताब्यात आला आहे. येथे इस्रायलच्या सैनिकांनी ठाण मांडले असून हमासच्या केंद्रांचा नायनाट करण्याचे काम हाती घेतले आहे. उत्तर भागात आता इस्रायलचेच नियंत्रण प्रस्थापित झाल्याची स्थिती असून हमासचे अस्तित्व पुसण्याची तयारी चाललेली आहे.
अद्यापही दहशतवादी भुयारांमध्ये
हमासचे हजारो दहशतवादी गाझा पट्टीतील भुयारांमध्ये अद्याप वावरत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी या भुयारांमध्ये एका टोकाकडून समुद्राचे कोट्यावधी लीटर पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी इस्रायलने जोरदार तयारी केली आहे. पाणी शिरल्यानंतर दहशतवाद्यांना आत राहणे अशक्य होईल.त्यांना बाहेर पडावेच लागेल. त्यानंतर ते मारले जातील किंवा धरले जातील.
आता दक्षिण भागावर लक्ष
इस्रायलचे आता गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर लक्ष आहे. येथेही हमासचे दहशतवादी लपलेले असून त्यांना शोधण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले. दोन्ही पक्षांमधील शस्त्रसंधी संपल्यानंतर इस्रायलकडून अधिक प्रमाणात तीव्र हल्ले करण्यात येत आहेत. हमासला पुन्हा डोके वर काढता येऊ नये, अशी व्यवस्था केली जाईल, असा निर्धार इस्रायली सेनेने दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला.
संयुक्त राष्ट्रसंघाचा आक्षेप
दक्षिण गाझा पट्टीवर इस्रायलने हल्ला केल्यास किंवा सैनिकी कारवाई केल्यास तेथील परिस्थिती अधिकच गंभीर होईल. तेथे फार मोठी मानवीय समस्या निर्माण होईल, असा आक्षेप संयुक्त राष्ट्रसंघाने घेतला आहे. दहशतवादाविरोधात कारवाई करताना सर्वसामान्य नागरीकांच्या हितासंबंधी दक्षता घेण्यात यावी. त्यांना त्रास दिला जाऊ नये, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी केले.
5 हजार दहशतवादी ठार
हमासचे 5 हजार दहशतवादी इस्रायलच्या सेनेने आतापर्यंत यमसदनी धाडले आहेत. हमासकडे 30 हजार दहशतवाद्यांची संघटना असल्याचे बोलले जाते. तथापि, इस्रायलने उत्तर गाझापट्टीत कारवाई सुरु केल्यानंतर अनेक दहशतवादी पळून ईजिप्तमध्ये गेल्याची चर्चा आहे. हमासचे 40 मोठे सूत्रधार आतापर्यंत मारले गेले आहेत. हमासच्या अंतापर्यंत युद्ध होत राहणार असे इस्रायलचे म्हणणे आहे.
चर्चेचा जवळपास अंत
शस्त्रसंधीचा कालावधी संपल्यानंतर इस्रायलने पुन्हा गाझापट्टीत जोरदार कारवाई सुरु केली असली तरी तीन दिवसांपूर्वीपर्यंत हमासशी त्याची चर्चा होत होती. तथापि, त्या चर्चेतून काहीही तोडगा न निघाल्याने तिच्या पुढच्या फेऱ्या झाल्या नाहीत. आता ही चर्चा जवळपास ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.