ऋतू हिवाळा, तापमान उन्हाळ्यापेक्षा अधिक
सरासरीपेक्षा 16 अंश तापमान अधिक
ऑस्ट्रेलियात अलिकडेच तापमान सरासरीपेक्षा 16 अंशाने अधिक राहिले आहे. तेथे शुक्रवारी तापमान 38.5 तर शनिवारी 39.4 अंश सेल्सिअस राहिले. तर दुसरीकडे सध्या ऑस्ट्रेलियात हिवाळा सुरू आडहे. हिवाळ्यात अशाप्रकारची उष्मालाट येणे धोकादायक संकेत आहे. ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने याकरता हवामान बदलाला जबाबदार ठरविले आहे. पुढील एक आठवड्यापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या हिस्स्यात अशाचप्रकारची उष्णता राहणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान विभागानुसार एक हाय प्रेशर सिस्टीम निर्माण झाल्याने ही उष्णता पसरली आहे. आणखी काही दिवस अशाच प्रकारे उष्णता राहू शकते. काही भागांमध्ये तापमानाचा नवा उच्चांक नोंदविला जाण्याचीही शक्यता आहे.
जग सातत्याने तप्त होत असून हे काही आता रहस्य राहिलेले नाही. 2024 हे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. मागील वर्षीही तापमानाचा उच्चांक नोंदविला गेला होता. यावेळी देखील याची पुनरावृत्ती होऊ शकते. हिवाळ्यात जर इतके तापमान असेल तर उन्हाळ्यात काय स्थिती असेल याची चिंता आता ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांना सतावू लागली आहे. ब्युरो आाrफ मेटेरियोलॉजीचे तज्ञ एंगस हाइन्स यांनी पुढील काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मध्य आणि त्यापुढील भागात तापमान नवा उच्चांक गाठणार असल्याचे सांगितले. कमाल तापमान खूपच अधिक असेल, ही अत्यंत असाधारण घटना आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियात पारा सरासरीपेक्षा 15 अंश सेल्सिअसने अधिक होता, ही एक भयावह स्थिती आहे.
फायर वेदर सीझन
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या फिट्जोरॉय क्रॉसिंगमध्ये रविवारी पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिला. टाउन्सविलेपासून मेलबर्नपर्यंत पारा सरासरीपेक्षा 2-12 अंश सेल्सिअसने अधिक राहिला. अद्याप ऑगस्ट महिना सुरू आहे. फायर सीझन अद्याप सुरू झालेला नाही. हीच स्थिती राहिली तर पुढील ऋतू धोकादायक असेल असे हाइन्स यांनी म्हटले आहे.
आकाश निरभ्र
पूर्व ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया सागराच्या वर जटिल हायप्रेशर सिस्टीम निर्माण झाली असल्याने आकाश पूर्णपणे निरभ्र आहे, वारे उत्तरेच्या दिशेने वाहत आहे, म्हणजेच दक्षिणेच्या दिशेने उष्णता वाढत आहे. आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीला भिडतात, यामुळे हवा खाली येत असल्याने उष्णतेत वाढ होत आहे.