For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सागर किनारी...1)

06:28 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
सागर किनारी   1
Advertisement

एखादी सकाळ सुंदर असते म्हणजे नेमकं काय ? हे जर खरंच बघायचं असेल तर कोकणातला समुद्रकिनारा गाठायला हवा. आम्ही कोणत्याही पदावर असलो कितीही मोठे अधिकारी असलो तरी कोकणच्या या लाल मातीच्या रस्त्याला लागलो की निसर्गाचा मोठेपण त्याचा पसारा जाणवायला लागतो आणि आमचे सगळे मुखवटे गळून पडायला सुरुवात होते. उंचच उंच सुरूची झाडं, माडाची झाडं माणसाचा खुजेपणा दाखवतात. जसजसा समुद्र जवळ यायला लागतो तसतशी त्याची गाज कानावर यायला सुरुवात होते आणि एका भेटीची अनावर ओढ मनाला हुरहूर लावते. जसजसं लाटांच्या संमुख जायला सुरुवात होते तसतसं एका वेगळ्याच विश्वात आपण फिरतो. आपण आल्याचा खरा आनंद या समुद्राला झालेला दिसतो. अगदी आपले दोन्ही बाहू पसरून लहान मुलांच्या निरागसतेने आपल्याला भेटायला तो पुढे पुढे धावत येतो. अगदी एखाद्या लेकुरवाळ्या बाईच्या घरात तिचा श्रीमंत भाऊराया आल्यानंतर एक एक मूल आनंदाने येऊन जसं भेटतं कडेवर बसतं, डोक्यावर बसतं त्याप्रमाणे या लाटांच्या भेटीचा कार्यक्रम सुरू होतो. खरंतर सतत एकमेकींच्या मागे धावणाऱ्या लाटा पळापळीचा खेळ खेळत असतात आणि एकमेकींच्या पाठीत धप्पा घालत असतात. तुम्ही जर गेलात तर तुम्हालाही  धप्पा घालायला मागेपुढे बघत नाहीत अशी ही अवस्था. ही लाट भेटत असताना तुमच्या पायावर पाणी आणून ओतावं आणि तुमचं स्वागत करावं असा सोहळा सुरू होतो. पण ह्यातच दुसरी एखादी खोडकर लाट पाण्याऐवजी तुमच्या पायावरती वाळूचे ढीग आणून ओतते, तिचा हा खट्याळपणा दाखवून देते. स्वच्छ झालेले पाय पुन्हा वाळूने बरबटतात तेवढ्यात दुसरी लाट येते आणि पुन्हा तुमचे पाय धुवायला सज्ज होते.हा खेळ आपल्याला खूप आवडतो आपल्या येण्याचा, असण्याचा आनंद इथे भरभरून अनुभवायला मिळतो. कारण आता या ठिकाणी आपण वाळूच्या कणा इतकाच लहान आहोत याची जाणीव या ठिकाणी झालेली असते. इथे आल्यानंतर आपली सगळी पदं, मोठेपणा, श्रीमंती, हे सगळे मुखवटे एकेक करून उतरून पडलेले असतात. आणि म्हणूनच हे सगळं अनुभवण्यासाठी समुद्रकिनारा गाठायला हवा याची जाणीव होते.

Advertisement

हा किनारा कधी उन्मत्त होत नाही किंवा निराशाही होत नाही. त्याची लय तो कायम ठेवतो. असंख्य प्राणिमात्रांना आपल्या पोटात जपत असतो, साठवत असतो, जसं सगळ्यांचे अपराध पोटात घेऊन जगताना कुठलाही मोठेपणा मिरवायचा नसतो तसं हे सगळं पाहिलं की आपण काही काळ तरी त्याच्या सानिध्यात आलो आणि त्याचा मोठेपणा मान्य केला की मनाला एक कृतकृत्यता जाणवते. आकाशाचे प्रतिबिंब घेऊन मिरवणारा हा निळाशार समुद्र मात्र किनाऱ्यावर वृक्षवेलीतून हिरवे रंग पेरत असतो आणि वाळूला मात्र सतत धुवून पुसून चमचमीत करून ठेवतो. किनाऱ्यांना टाळ्या देत खेळ करत असतो उंच होऊन येणारी लाट अशी काही आपटवतो की माणसाला नेमकं इथे जाणवतं की कितीही उंचीवर गेला तरी माणूस शेवटी खाली आपटणारच. तो जेवढा उंच तेवढा त्याची आपटण्याची भीतीही मोठी. जो वर जातो तो खाली येणारच हा एक साधा नियम या इथे लाटांच्या सानिध्यात अनुभवायला येतो. या लाटांच्या सानिध्यात तो पुन्हा जायला निघतो, लाटा अंगावर घेतो, या लाटांना उरावरी भेटतो सुद्धा, पण या भेटी चालू असतानाच त्याला जीवनाचा आणखीन एक सत्य इथे पाहायला मिळतं जेवढी लाट जोरात येते, तेवढीच ती परत जाताना किनाऱ्यावरची वाळू सुद्धा ओढून नेते. ही वाळू आपल्या पायाखालून अशी काही सरकते की त्या क्षणाला मृत्यूची गाठ पडली आहे की काय याची अनुभूती येते आणि म्हणूनच ‘पायाखालची वाळू सरकणे’ म्हणजे नेमकं काय याचा इथे अनुभव येतो. अशावेळी माणसाचे निसर्गावर पाया रोवून उभा राहण्याचं नेमकं कौशल्य जाणवतं.

आता मात्र स्थितप्रज्ञ असलेल्या वाळूचा किनारा तुम्हाला खुणावायला लागलेला असतो. पाण्यापासून आम्ही लांब जायला लागतो. कारण हा किनारा पाण्यात राहूनही अलीप्त कसं राहावं याचं आम्हाला उदाहरण देत असतो. सगळी दु:ख निराशा टाकून येणाऱ्या प्रत्येक लाटेला विसाव्यासाठी आपला खांदा द्यायला सज्ज असतो असा किनारा आपल्याला कधी आयुष्यात होता येते का ते बघूया.

Advertisement

Advertisement
Tags :

.