न्यूझीलंडला आणखी एक धक्का, सीयर्स अनफिट, डफीला स्थान
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
जखमी खेळाडूंमुळे त्रस्त झालेल्या न्यूझीलंड संघाला आणखी एक धक्का बसला असून वेगवान गोलंदाज बेन सीयर्स जखमी असल्याने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अनफिट ठरविण्यात आले आहे. त्याला धोंडशिरेची दुखापत झाली आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने त्याच्या जागी जेकब डफीची निवड केली आहे. बुधवारी कराचीत पहिल्या सराव सत्रावेळी सीयर्सला डाव्या पायाच्या धोंडशिरेजवळ वेदना होऊ लागल्या होत्या. त्यानंतर स्कॅनमध्ये त्याच्या शिरेला किंचीत दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. यातून बरे होण्यासाठी त्याला दोन आठवडे रिहॅबिलिटशन प्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले, असे न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले. त्याला बरे होण्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी लागणार असल्याने तो भारताविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्याला अनफिट ठरविण्याचा निर्णय घेतला गेला, असेही त्यांनी सांगितले.
डफी सध्या पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिकेत खेळत आहे. सीयर्ससाठी ही पहिलीच आयसी स्पर्धा होती. त्यात खेळता न येणे ही त्याच्यासाठी खूप वेदना देणारी व निराशाजनक बाब असेल, असे न्यूझीलंडचे प्रमुख प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले. डफी पाकिस्तानमध्येच खेळत असल्याने तिथल्या वातावरणाशी त्याने जुळवून घेतले असून तो फिटही असल्याने त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडची सलामीची लढत यजमान पाकिस्तानशी 19 फेब्रुवारी रोजी कराचीत होणार आहे.