डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर शिक्कामोर्तब
चार वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरागमन : बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प-बायडेन भेट होणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. शनिवारी अमेरिकेच्या एŸरिझोना राज्यातही डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. यासह त्यांनी सर्व 7 स्विंग राज्ये जिंकली आहेत. अॅरिझोनाच्या 11 जागाही (इलेक्टोरल व्होट) त्यांच्या खात्यात आल्या आहेत. अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने 50 राज्यांतील 538 जागांपैकी 312 जागा जिंकल्या. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना कडवी झुंज देऊनही केवळ 226 जागा जिंकता आल्या आहेत.
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 538 जागा आहेत. बहुमतासाठी 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते. मोठ्या विजयानंतर आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प 4 वर्षांनंतर दुसऱ्यांदा सत्तेवर येणार आहेत. बुधवारी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला. ग्रोव्हर क्लीव्हलँड यांच्यानंतर पराभवानंतर सत्तेत परतणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी अध्यक्ष आहेत. याआधी, ग्रोव्हर क्लीव्हलँड हे देखील 1892 च्या निवडणुकीत पराभवानंतर पुन्हा सत्तेत आले होते.
अमेरिकेत 50 राज्ये आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापैकी निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये निवडणुका जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत मिशिगन, जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, विस्कॉन्सिन आणि एŸरिझोना येथे डेमोव्रॅटिक पक्षाने विजय मिळवला होता. पण यावेळी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नेवाडा आणि नॉर्थ पॅरोलिनासह सर्व सात स्विंग राज्ये काबीज केली आहेत. अॅरिझोनाची गणना अमेरिकेतील स्विंग राज्यांमध्ये केली जाते. येथे विजयाचे अंतर खूपच कमी आहे. मात्र, गेल्या 70 वर्षांत डेमोक्रॅटिक पक्षाला येथे केवळ दोनदाच विजय मिळवता आला आहे. 2020 मध्ये जो बायडेन यांनी एŸरिझोना जिंकले होते.
व्हाईट हाऊसमध्ये होणार ट्रम्प-बायडेन भेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बुधवार, 13 नोव्हेंबर रोजी भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेणार आहेत. दोघांमधील ही भेट भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता होईल. व्हाईट हाऊसने रविवारी ही माहिती दिली. परंपरेनुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष भावी राष्ट्राध्यक्षांसोबत व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक बैठक घेतात. या बैठकीकडे सत्ता हस्तांतराच्या प्रक्रियेची नांदी म्हणून पाहिले जाते.
ट्रम्प यांच्याकडे शांततेने सत्ता सोपवणार : बायडेन
डोनाल्ड ट्रम्प हे निवडणूक जिंकत असल्याचे संकेत मिळाल्यानंतर बुधवारीच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी फोनवरून ट्रम्प यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले होते. एका दिवसानंतर, गुरुवारी बायडेन यांनी निवडणुकीतील पराभवाबद्दल सर्वप्रथम भाष्य केले. त्यानंतर आता त्यांनी ट्रम्प यांना शांततेने सत्ता सोपवण्याचे आश्वासन दिले आहे. बायडेन यांनी आपल्या प्रशासकीय यंत्रणेला ट्रम्प यांच्याकडे सत्ता सोपवण्यात पूर्ण मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अमेरिकन जनतेचा हक्क असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिनेटवर रिपब्लिकनचा कब्जा
रिपब्लिकन पक्षाने सिनेटवरही कब्जा केला आहे. सध्या पक्षाच्या सिनेटमध्ये 53 जागा आहेत आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडे 44 जागा आहेत. रिपब्लिकन पक्षाने आतापर्यंत लोकप्रतिनिधीगृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह) 213 जागा जिंकल्या आहेत. बहुमताचा आकडा 218 आहे. रिपब्लिकिनांना निम्म्याहून अधिक जागा मिळतील असा विश्वास आहे.
ट्रम्प अध्यक्ष झाल्यामुळे भारताला फायदा : मूडीज रेटिंग
मूडीज रेटिंगनुसार, ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे भारत आणि इतर आशियाई देशांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. किंबहुना, अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढता तणाव आणि धोरणात्मक क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संभाव्य निर्बंधांमुळे भारत आणि इतर आशियाई देशांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारीत सत्तेवर येणार आहेत.
अमेरिकेतील मतविभागणी
इलेक्टोरल मते
एकूण मते- 538 बहुमत-270
डोनाल्ड ट्रम्प - रिपब्लिकन पक्ष 312
कमला हॅरिस - डेमोक्रॅटिक पक्ष 226
संसदेतील दोन सदने
- सिनेट
एकूण जागा- 100 बहुमत- 51
डोनाल्ड ट्रम्प - रिपब्लिकन पक्ष 53
कमला हॅरिस - डेमोक्रॅटिक पक्ष 44
- लोकप्रतिनिधीगृह
एकूण जागा- 435 बहुमत- 218
डोनाल्ड ट्रम्प - रिपब्लिकन पक्ष 213
कमला हॅरिस - डेमोक्रॅटिक पक्ष 202