महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिल्प.... दगडातील कला.....

06:37 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भैय्यासाहेब ओंकारांनी एका ठिकाणी शिल्पकलेबद्दल लिहून ठेवले ‘कोणतीही भारतीय कला पाहिली की जाणवतं ती डोळ्यांना जरी दिसत असली तरी ती हृदयाला स्पर्श करते’. शिल्पकला हा त्यापैकीच असलेला एक आविष्कार. या कलेसाठीचा कलाकार मात्र अत्यंत कसलेला आणि निष्णात असावा लागतो. ओबडधोबड दगडातून अमूर्त कल्पना साधताना अत्यंत अवघड काम करतो. आणि अशा कामात सौंदर्य स्पर्श भाव अभिव्यक्ती प्रवाहित करतो. कारण त्याहूनही क्लिष्ट काम म्हणजे, कडे कपारीत लपलेला दगड जो ठोकरला जातोय, ज्याला स्वत:ला स्वत:चे असे अस्तित्व असूनही नसल्यासारखेच असते. त्याला जन्म आणि मृत्यू म्हणजेच(लय आणि विलय)व्हायला युगानयुगे लागतात. अशा दगडाला बोलकं करणारा कलाकार अध्यात्माच्या पातळीवर पोहोचलेला असल्याशिवाय शक्य नाही. या आध्यात्मिक वृत्तीमुळेच कलेला उर्जितावस्था आली आहे. आपल्यातले काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, काढून टाकून आत्मरूप प्रकट होणे जितकं अवघड तितकंच हे शिल्पकलेचे कामदेखील. अतिशय अलवार हाताने कठीण गोष्ट तोडणं जसं अवघड तशीच ही कलादेखील. गुजरातच्या अक्षरधाममध्ये चित्र प्रदर्शन पाहायला शिरताना एक सुंदर शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. स्वत:मध्ये नको असलेले भाग स्वत:च छिन्नी हातोड्याने उडवणारा कलाकार, स्वत:ची मूर्ती घडवताना आपल्याला अगदी तिथे मोहून टाकतो. अजंठामधील ध्यानमग्न बुद्धाची मूर्तीच पाहा ना. असे हसणारे दगड, रडणारे दगड, डोळ्यावाटे ओठाद्वारे व्यक्त करणारा कलाकार किती उच्च दर्जाचा असावा ह्याची कल्पना करण्यात आपलं सगळं आयुष्य संपून जाईल. जादूच्या नगरीत असे दगडात प्राण ओतून चालणाऱ्या मूर्ती असायच्या पण वास्तवात मात्र दगडात प्राण ओतणारे शिल्पकार आमच्या अवतीभोवतीच असतात. शिल्पकलेत सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘तोल राखणं’. आमच्यासारख्या चालत्या बोलत्या माणसाला चालताना, बोलतानासुद्धा नीट तोल राखता येत नाही, तर आम्ही कलाकृतीचा काय तोल राखणार? पण शिल्पकार मात्र या दगडात प्राण ओतून त्यातील सरलता, वक्रता, उठाव, गती आणि वळण असं सगळं काही एक विशिष्ट तोल राखून कोरत असतो. एकाच वेळी ती कलाकृती भव्य दिव्य असून सूक्ष्मता निर्माण करते आणि नजाकतीने साकारली जाते. इथे या शिल्पकाराचं कसब पणाला लागतं. हे सगळं करताना अचेतनातून चेतना निर्माण करणे म्हणजे स्वत:च्या हृदयातलं त्या दगडाच्या हृदयात ओतणं सुरू असतं. इथे आहे त्याच्या पलीकडे त्याला काहीतरी वेगळं दिसत असल्यामुळे ती मूर्ती तिथे साकार होत असते. त्याला ललित कलेच्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागतं. जे सामान्य माणसाला अगदी मनापासून आवडतं. कारण तो तत्त्वज्ञान वाचण्यापेक्षा मूर्तीतून देवाच्याजवळ चटकन जाऊ शकतो. त्यातला संस्कार आत्मसात करू शकतो. म्हणून भारतीय तत्त्वज्ञान ग्रंथांपेक्षा मूर्तीतून जास्त बोलतं असं म्हटलं जातं, ते उगाच नाही. अशी शिल्पकला मंदिरातून मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे देवत्व, अन् दिव्यशक्तीचा साक्षात्कार या गोष्टी मूर्तींच्या माध्यमातूनच व्यक्त होताना दिसतात. ज्ञानदेव लिहितात ‘दो वरी दोन्ही भुजा,(चतुर्भुज) आलो, घेऊनी.. आलीगावया लागोनि तयाचा देह .....तया पहावयाचे डोहाळे म्हणूनी अचक्षुसी मज डोळे ......हातीचेनी लीला कमळे तयासी पुजू....’ श्रीकृष्णाचा जन्म त्याच्या भक्तांसाठी म्हणजेच अर्जुनासाठी झाला. वेरूळचा शिल्प अशाच सगळ्या पुराण कथांना जतन करणारा विश्वाचा महिमा गाणारा ठरलाय. शिल्पातून जवळून स्वर्ग गाठल्याचा आनंद या ठिकाणी मिळतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आमच्या मंदिरातील सर्वच मूर्ती वेदांचा संदेश देतात. सर्वत्र ईश्वरी अंशाचा साक्षात्कार करतात. मीनाक्षी मंदिरातील एकेक शिल्प म्हणजे एकेक ग्रंथ वाटतात. त्यांच्या उरात जणू भारताची एकात्मता, अखंडता कायमच सांभाळून ठेवण्याचं व्रत त्यांनी स्वीकारल्यासारखं वाटतं. या सगळ्या मूर्ती बनवून घेणारा राजा आपला इतिहास, आपले संस्कार यातूनच सगळं काही जतन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी स्वत:चे पुतळे कधीच केले नाहीत तरी चित्रे साकारली पण ती हाऊस म्हणून. या मूर्तीच्या आणि मंदिराच्या माध्यमातून जास्त जपली जाते आपली वैविध्यपूर्ण अशी संस्कृती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article