मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची मूर्तिकारांची लगबग
केदनूर गावातील मूर्तिकार रंगकाम करण्यात मग्न : 5 ते 12 फूट उंचीच्या गणेशमूर्ती बनवण्यात हातखंडा : अनेक ठिकाणांहून मूर्तींची मागणी
वार्ताहर/कडोली
मूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदनूर गावात श्री गणेशमूर्ती बनविण्यात अंतिम टप्प्यातील रंगकामात मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी एका केदनूर गावातून मोठे सार्वजनिक गणेशमूर्ती तर 2500 घरगुती मूर्तींची मागणी आहे. सुबक आणि आकर्षक गणेशमूर्ती बनविण्यात हातखंडा असलेल्या केदनूर गावातील सुतार, लोहार मूर्तिकारांची सध्या एकच घाई चालली आहे. गणरायाचे आगमन अवघे दोन-तीन दिवसांवर आले आहे. त्यामुळे आळीपाळीने 24 तास काम करताना पहावयास मिळत आहे. गणेशमूर्तीना सजविण्यासाठी रंगकाम जोरात सुरू आहे. येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्राय लोहार यांचे नाव सर्वत्र परिचित आहे. बेळगाव आणि आसपासच्या भागात त्यांच्या गणेशमूर्तीना बऱ्याचवेळा प्रथम, द्वितीय, तृतीय अशी बक्षिसे मिळाली आहेत.
ते बेळगावातील नामांकित अशा हिंदवाडी, खडेबाजार, रामलिंग खिंड, समादेवी गल्ली, बुरुड गल्ली, मारुती गल्ली, शिवाजी कॉलनी, शहापूर, कडोलकर गल्ली, सदाशिवनगर, बेन्नाळी येथील गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती बनवतात. केदनूर येथील गणेश मूर्तिकार कुमार नागाप्पा लोहार आणि शटू बाबू लोहार यांचेकडे 40 सार्वजनिक गणेशमूर्तींची मागणी आहे. त्यांनी 5 ते 12 फुटापर्यंत उंचीच्या गणेशमूर्ती बनविल्या असून त्यांच्या मूर्तींना हिंदवाडी, मजगाव, मच्छे, बैलहोंगल, नेसरगी, नागेनट्टी, देसूर, कंग्राळी, कडोली, देवगिरी, पाच्छापूर, संकेश्वर आदी ठिकाणाहून मागणी आहे. केदनूर येथील आणखी काही मूर्तिकार राहुल यलाप्पा सुतार, बाळू कल्लाप्पा सुतार आणि रामचंद्र लोहार या मूर्तिकारांकडे घरगुती गणेशमूर्तींची मागणी आहे. यातील एक मूर्तिकार राहुल यल्लाप्पा सुतार यांची बाँबे मातीच्या (क्ले मातीच्या) सुबक गणेशमूर्ती बनविण्यात कला आहे.
मूर्तींच्या किमतीही वाढल्या
गणेशमूर्तीच्या मागणीप्रमाणे सहाय्यक मूर्तिकारांची तितकीच आवश्यकता असते. पुरेसे कर्मचारी मिळत नसल्याने प्रमुख मूर्तिकारांची फार मोठी पंचायत होते. गणेशमूर्ती तर वेळेत पूर्ण होणे गरजेचे असते. त्यामुळे असलेल्या मूर्तिकारांना तब्बल 15 ते 16 तासांपर्यंत काम करावे लागते. त्यामुळे सर्वांची दमछाक होते. शिवाय गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य, रंग दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशमूर्तींच्या किंमतीही नाईलाजाने वाढवाव्या लागतात, अशी प्रतिक्रिया शटू लोहार यांनी दिली.
मंडप उभारणी, विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात
सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसात येऊन ठेपला असून पूर्वभागामध्ये मंडप उभारणीसह विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी, कणबर्गी, कलखांब, मुचंडी, अष्टे, चंदगड आदी गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवानिमित्त गेल्या पंधरा दिवसापासून दररोज वर्गणी गोळा करण्याचे काम मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. मंडप उभारणीसह विद्युत रोषणाई करणे आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. काही मंडळांनी आकर्षक मूर्ती आणण्यावर भर दिला आहे. तर काही मंडळांनी आकर्षक देखावे करण्यावर भर दिला आहे.
अनेक गणेशोत्सव मंडळांचे आगमन सोहळे
आगमन सोहळ्यांची क्रेझ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.आगाऊ काही दिवस सार्वजनिक मूर्ती आणून आगमन सोहळे मोठ्या उत्साहात केले जातात. महाराष्ट्रातील आगमन सोहळ्यांचे लोण आता बेळगाव शहर व तालुक्यामध्येही आले आहे. अनेक मंडळे आगमन सोहळा मोठ्या उत्साहात करत आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक मंडळांचे आगमन सोहळे उत्साहात पार पडले.
गुंजीत गणेशमूर्ती रेखणी काम अंतिम टप्प्यात
गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोनच दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे येथील मूर्तिकारांची गणेशमूर्तीवर रंगकामाबरोबरच रेखणीचा अखेरचा हात फिरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या भागातील मूर्तिकार शेडूच्या शेकडो मुर्तीं बनविल्या असून गेल्या आठ-दहा दिवसापासून आपल्या परिवारासह गणेशमूर्तींना अहोरात्र रंगकाम देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सध्या मूर्ती रेखणी करून आकर्षक सजावट करण्याचे कार्य सुरू असून ते अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून ते गणेशमूर्ती बनविण्याचे कार्य करीत असून येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार आणि चित्रकार कै. विठ्ठल कुंभार यांचे ते शिष्य होत. पूर्वी विठ्ठल कुंभार यांच्या मोठमोठ्या गणेशमूर्ती बेळगावसह, कोल्हापूर, गोवा येथे जात असत. त्यामुळे आजही या भागामध्ये येथील शेडूच्या पर्यावरणपूरक मूर्तींना मोठी मागणी आहे.