ई-श्रम नोंदणीकृत कार्डधारकांची छाननी
अन्न-नागरी पुरवठा खात्याची कार्यवाही
बेळगाव : रेशनकार्डसाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी काही अर्जांना स्थगिती देण्यात आली आहे. शहरी भागातून 1832 तर बेळगाव तालुक्यातून 1400 अर्ज दाखल झाले आहेत. ई-श्रम नोंदणीकृत कामगारांची रेशनकार्ड मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. ई-श्रम कार्ड असलेल्या कामगारांनी रेशनकार्ड मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ई-श्रम कार्ड असलेल्या कामगारांना रेशनकार्ड वितरणात प्राधान्य द्यावे, असा आदेश बजावला आहे. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून ई-श्रम नोंदणीकृत कामगारांना अर्ज आणि रेशनकार्ड वितरण सुरू आहे. सद्यस्थितीत अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे असलेल्या ई-श्रम कार्ड लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे. ज्या लाभार्थ्यांकडे रेशनकार्ड नाही, अशा ई-श्रम नोंदणीकृत कामगारांना रेशनकार्ड वितरीत केले जात आहे. ज्या लाभार्थ्यांकडे रेशनकार्ड आहे अशा लाभार्थ्यांचे केवळ लिंक केले जात आहे. ई श्रम कामगारांना रेशनकार्डसाठी प्रक्रिया सुरू केली असली तरी इतर तळागाळातील गोरगरिबांसाठी अद्याप रेशनकार्ड वितरण प्रक्रिया ठप्प आहे.