रेशनकार्डसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी
अन्न-नागरी पुरवठा खात्याकडून प्रक्रिया
बेळगाव : रेशनकार्डसाठी आलेल्या नवीन अर्जांची छाननी करण्याचा आदेश अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिला आहे. त्यामुळे खात्याचे अधिकारी नवीन अर्ज छाननीच्या कामात व्यस्त झाले आहेत. शिवाय नवीन रेशनकार्ड वितरणालाही येत्या 10-15 दिवसांत प्रारंभ होईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रेशनकार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मागील दोन वर्षांत नवीन रेशनकार्ड वितरणाची प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. गॅरंटी योजनांच्या लाभासाठी बीपीएल कार्डची मागणी वाढली आहे. यासाठी जिल्ह्यातून 75 हजारहून अधिकजणांनी अर्ज केले आहेत, तर 30 हजारहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. ऑनलाईन दाखल झालेल्या अर्जांची छाननी खात्यामार्फत केली जात आहे. शिवाय नवीन रेशनकार्ड वितरण सुरू होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला चालना देण्यात आली आहे. नावात बदल करणे, पत्ता बदलणे, नवीन नाव जोडणे, आदी कामे केली जात आहेत. ग्राम वन आणि बेळगाव वनमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनियप्पा यांनी नवीन रेशनकार्ड वितरणाला लवकरच प्रारंभ केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र आश्वासन देऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. मात्र आता अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून येत्या 15 दिवसांत नवीन रेशनकार्ड वितरणाला प्रारंभ होईल, अशी माहिती दिली जात आहे.