मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच
शिवकुमार गटाच्या आमदारांनी घेतली वरिष्ठांची भेट : पक्षाध्यक्ष खर्गे आज बेंगळुरात : दोन्ही गटांशी चर्चेची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेस सरकारमधील राजकीयनाट्या पुन्हा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या समर्थकांच्या मदतीने अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळविण्यासाठी स्वत:चे राजकीय फासे टाकत आहेत. त्यांच्या समर्थक मंत्री, आमदारांनी शुक्रवारी दिल्लीत काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार वाटप कराराची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीय मंत्र्यांनी गुरुवारी रात्री भोजनावळीच्या निमित्ताने पुढील रणनीतीवर चर्चा केली. त्यामुळे शनिवारच्या राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित झाले आहे.
राज्यातील काँग्रेस सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर अधिकार हस्तांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. इतके दिवस पडद्याआड होणाऱ्या राजकीय मोर्चेबांधणी आता उघडपणे सुरू झाली आहे. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोन्ही गट आता उघडपणे रणनीती आखत असून मुख्यमंत्रिपद हस्तांतराचा मुद्दा निर्णयाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घ्यावा, या पेचात सापडले आहे.
शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी त्यांचे समर्थक दोन मंत्री व काही आमदारांनी शुक्रवारी रात्रीच दिल्लीला धाव घेतली. शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतर कराराची अंमलबजावणी करण्याची विनंती केल्याचे समजते. शिवकुमार यांच्या गटातील आमदार हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्यानंतर इकडे बेंगळूरमध्ये सिद्धरामय्या यांच्या गटातील मंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. जी. परमेश्वर, डॉ. एच. सी. महादेवप्पा, दिनेश गुंडूराव, के. वेंकटेश, माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी भोजनावळीच्या निमित्ताने एकत्र येऊन राजकीय रणनीतीवर चर्चा केल्याचे समजते.
पक्षातील गोंधळ दूर करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बेंगळूरला आले आहेत. सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यासह त्यांच्या समर्थक मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते. त्यामुळे दिल्लीला गेलेले शिवकुमार गटातील मंत्री, आमदारही बेंगळूरला परतण्याची शक्यता आहे.
उघडपणे वक्तव्ये नकोत : सुरजेवाला
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी आता हस्तक्षेप केला आहे. पक्षातील कोणत्याही आमदाराने राजकीय मुद्द्यांवर उघडपणे वक्तव्ये करू नयेत, अशी ताकीद त्यांनी दिल्याचे समजते.
पक्षात कोणताही गोंधळ नाही : डॉ. परमेश्वर
राज्य काँग्रेसमध्ये कोणताही गोंधळ नाही. काही आमदारांनी एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. या भेटीला विशेष अर्थ लावण्याची गरज नाही. पक्षातील आमदार, नेते दिल्लीला गेल्यानंतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा प्रघात आहे. आमदारांनी वरिष्ठांच्या भेटीविषयी स्पष्टीकरणही दिले आहे. पक्षात गोंधळाची स्थिती नाही. जर तशी परिस्थिती उद्भवली तर हायकमांड हस्तक्षेप करेल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली.
पक्षाध्यक्ष खर्गे आज बेंगळुरात
मुख्यमंत्रिपदावरून राज्य काँग्रेसमध्ये चढाओढ निर्माण झालेली असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे शनिवारी बेंगळूरला धाव घेणार आहेत. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे खर्गेंची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा करण्याची दाट शक्यता आहे. अंतिमत: काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेईल, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
गटबाजी माझ्या रक्तात नाही : शिवकुमार
माझ्याजवळ कोणताही गट नाही. मी कोणत्याही गटाचा नेता नाही. मी 140 आमदारांचा अध्यक्ष आहे. सर्व आमदार माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. गटबाजी माझ्या रक्तात नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेंगळुरातील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना दिली. दिल्लीला कोणताही गट घेऊन जाण्याची माझी इच्छा नाही. मी गटबाजी करत नाही. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेची घोषणा केल्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला जाणे स्वाभाविक आहे. काहीजण मंत्र्यांसोबत गेले आहेत, तर काहीजण स्वत:हून. यात काय चूक आहे? मी कोणालाही रोखू शकत नाही.
पुढील अडीच वर्षे मीच मुख्यमंत्री!
पुढील अडीच वर्षे मीच मुख्यमंत्रिपदावर राहीन. मीच पुढील दोन अर्थसंकल्पही सादर करेन. यात शंका नको. पक्षाच्या हायकमांडने नेतृत्व बदलाविषयी वक्तव्य केले आहे का? नेतृत्व बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेसह सर्व बाबींवर हायकमाडंच निर्णय घेते.
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
सिद्धरामय्यांचा वरिष्ठांना फोन
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावतीने त्यांच्या समर्थक मंत्री, आमदारांनी दिल्लीला धाव घेतल्याने इकडे चिंतेत असलेल्या सिद्धरामय्या यांनी पक्षश्रेष्ठींना फोन करून गोंधळ दूर करण्याची विनंती केली आहे. शुक्रवारी सकाळी फोन करून त्यांनी वरिष्ठांना राजकीय परिस्थितीची माहिती दिली. तसेच दिल्लीत असलेले मंत्री चेलुवरायस्वामी यांच्यासह काही आमदारांशीही मुख्यमंत्र्यांनी फोनवरून संभाषण केल्याचे समजते.