ऑस्ट्रेलियाकडून स्कॉटलंडचा ‘व्हाईटवॉश’
कॅमेरुन ग्रीनला सामनावीर-मालिकावीराचा दुहेरी मुकुट
वृत्तसंस्था/ एडीनबर्ग
स्कॉटलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 23 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यानी दणदणीत पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनने गोलंदाजीत 35 धावांत 3 गडी बाद केले. तर फलंदाजीत त्याने 39 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 62 धावा झोडपल्या. या कामगिरीमुळे कॅमेरुन ग्रीन या मालिकेत सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी मुकुटाचा मानकरी ठरला.
या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजी दिली. स्कॉटलंडने 20 षटकात 9 बाद 149 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 16.1 षटकात 4 बाद 153 धावा जमवित विजय नोंदविला.
स्कॉटलंडच्या डावामध्ये ब्रेंडॉन मेकॉलमने 39 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 56, मुनसेने 17 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 25, लिसेकने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13, वेटने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18, हेअर्सने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. स्कॉटलंडच्या डावात 8 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे कॅमेरुन ग्रीनने 35 धावांत 3 तर अॅबॉटने 28 धावांत 2, हार्डीने 18 धावांत 2, स्टोइनिस आणि झंपा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये ग्रीनने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी करताना 39 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 62 तर हेडने 11 चेंडूत 2 चौकारांसह 12, मिचेल मार्शने 23 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 31, टीम डेव्हिडने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25, हार्डीने 6 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 8 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. स्कॉटलंडतर्फे क्युरीने 20 धावांत 2 तर सोले आणि जार्व्हिस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मार्श आणि ग्रीन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 61 धावांची तर ग्रीनने डेव्हिड समवेत चौथ्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली.
संक्षिप्त धावफलक - स्कॉटलंड 20 षटकात 9 बाद 149 (मेकॉलम 56, मुनसे 25, वेट 18, लिसेक 13, हेअर्स 12, अवांतर 3, ग्रीन 3-35, अॅबॉट 2-28, हार्डी 2-18, स्टोइनिस 1-14, झंपा 1-28),
ऑस्ट्रेलिया 16.1 षटकात 4 बाद 153 (हेड 12, मॅकगर्क 0, मिचेल मार्श 31, ग्रीन नाबाद 62, डेव्हिड 25, हार्डी नाबाद 11, अवांतर 12, क्यूरी 2-20, सोले, जार्व्हिस प्रत्येकी 1 बळी).