स्कॉटलंडची पाकवर मात, लंका विजयी
वृत्तसंस्था/ दुबई
पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) होणाऱ्या आयसीसीच्या 2024 च्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी येथे आयोजिलेल्या सरावाच्या सामन्यात स्कॉटलंडने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. तर दुसऱ्या एका सामन्यात लंकेने बांगलादेशवर विजय मिळविला.
पाक आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्यात स्कॉटलंडच्या खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरीचे शानदार दर्शन घडविले. स्कॉटलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर पाक संघाची एकवेळ स्थिती 4 बाद 33 अशी केविलवानी होती. त्यानंतर पाक संघातील मुनीबा अलीने 22 चेंडूत 3 चौकारांसह 27 तसेच ओमिमा सोहेलने 29 चेंडूत 2 चौकारांसह 30 धावा जमविल्याने पाकने 20 षटकात 9 बाद 132 धावांपर्यंत मजल मारली. स्कॉटलंडतर्फे कॅथरिन ब्रिसेने 20 धावांत 3 तर बेल आणि मक्सूद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्कॉटलंडच्या डावाला सारा ब्रिसे आणि हॉर्ले यांनी दमदार सुरुवात करुन देताना 11.3 षटकात 73 धावांची भागिदारी केली. पाकच्या नशाराने हॉर्लेला बाद केले. तिने 42 चेंडूत 48 धावा जमविताना 6 चौकार धोकले. त्यानंतर सारा आणि कॅथरिन ब्रिसे भगिनींनी विजयाला हातभार लावला. कॅथरिन ब्रिसे 18 धावांवर धावचीत झाली. सारा ब्रिसेने 52 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 60 धावा झळकाविल्या. स्कॉटलंडने हा सामना 2 षटके बाकी ठेऊन 8 गड्यांनी जिंकला.
अन्य एका सरावाच्या सामन्यात लंकेने बांगलादेशवर विजया मिळविला. या सामन्यात लंकेने 20 षटकात 7 बाद 143 धावा जमविल्या. हसिनी परेराने 39 चेंडूत 3 चौकारांसह 43 तर निलाक्षी डिस्लिव्हाने 23 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा जमविताना 58 धावांची भागिदारी केली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली होती. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने 20 षटकात 9 बाद 110 धावा जमविल्या. बांगलादेश संघातील निगार सुल्तानाने 38 चेंडूत 1 चौकारासह 30 तर दिशा विश्वासने 16 चेंडूत 4 चौकारांसह 25 धावा जमविल्या. लंकेतर्फे इनोशी फर्नांडोने 11 धावांत 2 तर सुगंधीका कुमारीने 8 धावांत 3 गडी बाद केले.