स्कॉटलंडचा ओमानवर सात गड्यांनी विजय
सामनावीर ब्रेंडन मॅकमुलेन : नाबाद 61, प्रतीक आठवले (54 धावा) : अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ नॉर्थ साऊंड (अँटिग्वा आणि बर्बुडा)
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ब गटातील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ब्रेंडन मॅकमुलेनच्या समायोचीत नाबाद अर्धशतकाच्या जोरावर स्कॉटलंडने ओमानचा 7 गड्यांनी पराभव करत या गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. या सामन्यात स्कॉटलंडच्या ब्रेंडन मॅकमुलेनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकात ओमानने 7 बाद 150 धावा जमविल्या. त्यानंतर स्कॉटलंडने 13.1 षटकात 3 बाद 153 धावा जमवित हा सामना 41 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी जिंकला या विजयामुळे ब गटात स्कॉटलंडने आघाडीचे स्थान मिळविले आहे. स्कॉटलंडने यापूर्वी ब गटातून 2 सामने जिंकले असून 1 सामना रद्द झाला होता. स्कॉटलंडने 3 सामन्यातून 5 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे.
ओमानच्या डावामध्ये सलामीच्या प्रतीक आठवलेने 40 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 54 धावा झळकाविल्या. आयान खानने 39 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 41 धावा जमविल्या. कर्णधार अकिब इलियासने 6 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16, नसिम खुशीने 1 षटकारासह 10, मेहरान खानने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. ओमानच्या डावात 4 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. ओमानला 5 अवांतर धावा मिळाल्या. ओमानने पॉवरप्लेच्या 6 षटकात 53 धावा जमविताना 2 गडी गमविले. ओमानचे अर्धशतक 36 चेंडूत, शतक 84 चेंडूत तर दीडशतक 120 चेंडूत फलकावर लागले. आठवलेने आपले अर्धशतक 38 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. स्कॉटलंडतर्फे एस. शरिफने 40 धावांत 2 तर मार्क वॅट, व्हिल, सोल, ग्रिव्हेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना स्कॉटलंडने 13.1 षटकात 3 बाद 153 धावा जमवित हा सामना 7 गड्यांनी जिंकला. ब्रेंडन मॅकमुलेनने 31 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 61, जॉर्ज मुन्सीने 20 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 41, मायकेल जोन्सने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 16, कर्णधार बेरिंग्टनने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 तर मॅथ्यू क्रॉसने 8 चेंडूत 2 षटकारांसह 15 धावा जमविल्या. स्कॉटलंडच्या डावात 11 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले.
स्कॉटलंडने पॉवरप्लेच्या 6 षटकात 50 धावा जमविताना 1 गडी गमविला. स्कॉटलंडचे अर्धशतक 35 चेंडूत, शतक 54 चेंडूत तर दीडशतक 79 चेंडूत फलकावर लागले. मॅकमुलेनने 27 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. ओमानतर्फे बिलाल खान, अकिब इलियास आणि मेहरान खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : ओमान 20 षटकात 7 बाद 150 (प्रतीक आठवले 54, खुशी 10, इलियास 16, आयान खान 41, मेहरान खान 13, अवांतर 5, एस. शरिफ 2-40, मार्क वॅट, ख्रिस सोल आणि ग्रिव्हेस प्रत्येकी 1 बळी), स्कॉटलंड 13.1 षटकात 3 बाद 153 (जॉर्ज मुन्सी 41, मायकेल जोन्स 16, मॅकमुलेन नाबाद 61, बेरिंग्टन 13, क्रॉस नाबाद 15, अवांतर 7, बिलाल खान, अकिब इलियास, मेहरान खान प्रत्येकी 1 बळी).