पाय फ्रॅक्चर होऊनही अर्धशतकाची नोंद
रिषभ पंतच्या धाडसावर क्रिकेट जगताकडून कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फ्रॅक्चर झालेल्या पायासह खेळताना रिषभ पंतने फटकावलेल्या धाडसी अर्धशतकाने केवळ त्याचे धाडस दाखवलेले नाही, तर तो संघासाठी खेळणारा खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी व्यक्त केले आहे.
पंतचे डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भयानक कार अपघातानंतर उच्च दर्जाच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन आधीच उल्लेखनीय होते. परंतु आदल्या दिवशी 37 धावांवर दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागल्यानंतर गुऊवारी फ्रॅक्चर झालेल्या पायासह अर्धशतक पूर्ण करून त्याने आपली धाडसी कामगिरी आणखी एका वेगळ्या पातळीवर नेली. ‘जर कोणाला तो संघासाठी खेळणारा खेळाडू आहे की नाही याविषयी शंका असेल, तर त्यांना ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी पोलादापेक्षा जास्त मजबूत निर्धार लागतो’, असे शास्त्राr यांनी बीसीसीआयने त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
त्याने परत येऊन जे केले ते खास होते. कधी कधी प्रेरणा वेगळ्या पातळीवर जाते. त्याने संघासाठी जे केले आहे त्यामुळे संघाचे मनोबल उंचावले नाही, तर काहीही होणार नाही. इंग्लंड संघातील सर्वांकडून त्याला टाळ्या मिळाल्या. तुम्ही त्यासाठीच जगता, त्यासाठीच खेळता. त्यातून तुम्ही घडता’, असे शास्त्राr म्हणाले. चौथ्या कसोटीपूर्वी लॉर्ड्स कसोटीदरम्यान यष्टीरक्षण करताना पंतच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर पंतची यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून उपलब्धता संशयाच्या घेऱ्यात होती. ‘त्याला विचारण्यात आले की, बोट कसे आहे, तू खेळशील का, मग तो म्हणाला मोडलेले असले तरी, खेळेन. आता त्याने जे काही केले आहे त्याची झलक त्यातून दिसून येते. त्याला कसोटी क्रिकेट खेळायला आवडते, त्याला त्याच्या देशासाठी खेळायला आवडते’, असे शास्त्राr म्हणाले.
हव्या तशा हालचाली करता येत नसल्याने पंतने स्थिर राहून फलंदाजी आणि एका पायाच्या आधारे फटके हाणले तसेच लंगडत एकेरी धावा काढल्या. एकूण 54 धावा काढताना 70 मिनिटांत त्याने 27 चेंडूंत 17 धावा जोडल्या. ही खेळी केवळ आकड्यांपेक्षा जास्त महत्त्वाची होती. आम्हाला त्याच्यासारख्या खेळाडूंची गरज आहे, जे कठीण क्षणांमध्ये मदतीस येऊ शकतात. त्याने इतके वेदना होत असूनही खूप धैर्य दाखवले. खेळपट्टीवर येऊन अशा प्रकारे देशासाठी लढण्याची तयारी दाखवणे कधीही सोपे नसते’, असे भारताचा माजी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा व्हिडिओमध्ये म्हणाला.