महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानात उद्यापासून एससीओ शिखर परिषद

06:45 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकरही उपस्थित राहणार

Advertisement

► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानमध्ये 15-16 ऑक्टोबर रोजी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषद होत आहे. या बैठकीच्या तयारीबाबत रविवारी पाकिस्तानी अधिकाऱ्यांची बैठक झाली. वृत्तानुसार, या बैठकीत शिखर परिषदेसाठी राजधानी इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि सज्जता ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिखर परिषदेत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही सहभागी होणार आहेत. त्यांच्याशिवाय चीनचे पंतप्रधान ली कियांग, रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन आणि इतर देशांचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

एससीओ शिखर परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानात विदेशातील बड्या नेत्यांची रेलचेल वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारकडून आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. याचदरम्यान पीटीआय कार्यकर्त्यांच्या हिंसक निदर्शने आणि राजकीय अशांततेमुळे पाकिस्तान सरकार चिंतेत आहे. शिखर परिषदेदरम्यान होणाऱ्या संभाव्य निदर्शनांमुळे देशाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी शाहबाज शरीफ सरकारकडून अत्यावश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच दहशतवादी संघटनांपासून असलेला हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी गुप्तचर विभागासह सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.

राजधानीत निदर्शने करण्यास बंदी

पाकिस्तानमधील शिखर परिषदेमुळे राजधानी इस्लामाबादमध्ये निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात लष्कर तैनात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्या समर्थकांनाही अटक करण्यात आली आहे. ही शिखर परिषद पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सरकार सुरक्षेसाठी ठोस व्यवस्था करत आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्मयुरिटी स्टडीजचे कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ विश्लेषक इम्तियाज गुल यांनी सांगितले.

इम्रान खान यांच्या पक्षाचा इशारा

विरोधी पक्षनेते इम्रान खान यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफने शिखर परिषदेदरम्यान निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. वास्तविक, इम्रान तुऊंगात असून त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी त्याच्या समर्थकांनी अनेकवेळा निदर्शने केली आहेत. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी इम्रान समर्थकांनी इस्लामाबादमध्ये निदर्शने केली होती. यानंतर शहर 3 दिवस बंद ठेवण्यात आले होते. मोबाईल नेटवर्क बंद करण्याबरोबरच शहराबाहेर जाणारे रस्तेही बंद करण्यात आले. आता सर्व व्यवस्था पूर्ववत झाल्या असल्या तरी सावधगिरीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दहशतवादी हल्ल्यांमुळे चिंता

शिखर परिषद सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये 2 दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिला हल्ला 6 ऑक्टोबरला कराची विमानतळाजवळ झाला. या हल्ल्यात दोन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावर चीनने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दुसरा हल्ला 11 ऑक्टोबर रोजी बलुचिस्तान प्रांतातील एका खासगी कोळसा खाणीत झाला. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटासाठी हल्लेखोरांनी रॉकेट आणि हँडग्रेनेडसह अनेक आधुनिक शस्त्रे वापरली. शिखर परिषदेपूर्वी झालेल्या या स्फोटांमुळे सर्व यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article