For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिरीबाम-इंफाळ खोऱ्यात पुन्हा शाळा गजबजणार

06:05 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिरीबाम इंफाळ खोऱ्यात पुन्हा शाळा गजबजणार
Advertisement

आजपासून पुन्हा शाळा-महाविद्यालनांना प्रारंभ : मोबाईल इंटरनेटवर बंदी कायम

Advertisement

► वृत्तसंस्था/ इंफाळ, नवी दिल्ली

गेल्या दोन वर्षांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. तेथील परिस्थिती अजून सामान्य झालेली नाही. मैतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्षामुळे परिस्थिती चिघळतच गेली. गेल्या पंधरवड्यात संघर्ष भडकला असला तरी आता कडक सुरक्षा तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. याचदरम्यान मणिपूरमधील इंफाळ व्हॅली आणि जिरीबाम जिह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 25 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र, या जिह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट बंदी कायम आहे.

Advertisement

18 नोव्हेंबर रोजी इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, विष्णुपूर, काकचिंग आणि जिरीबाम जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. वाढत्या हिंसाचारामुळे सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला होता.  शाळा बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे आता सोमवारपासून त्या पुन्हा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करून शाळांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्वयंसेवक आणि पालकांनाही विशेष दक्षता पाळण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व सरकारी शाळा, सरकारी अनुदानित शाळा, खासगी आणि केंद्रीय शाळांमध्ये 25 नोव्हेंबरपासून सामान्य वर्ग सुरू होतील, असे शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधी आदेश जारी करताना राज्यातील सर्व विद्यापीठे, सर्व सरकारी आणि सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये 25 नोव्हेंबरपासून वर्ग पुन्हा सुरू होतील, असे स्पष्ट केले.

 आमदारांच्या घरावर हल्ला, 41 आरोपींना अटक

मैतेई समाजाच्या तीन अपहृत महिला आणि तीन मुलांचे मृतदेह सापडल्यापासून 7 जिह्यांमध्ये हिंसाचार सुरू होता. तसेच 16 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासह 17 आमदारांच्या घरांवर हल्लेही करण्यात आले. मणिपूर पोलिसांनी याप्रकरणी आणखी 7 जणांना अटक केली. आतापर्यंत एकंदर 41 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबर रोजी जिरीबाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 10 कुकी दहशतवादी मारले गेले.

सीएपीएफच्या 288 कंपन्यांकडून दक्षता

मणिपूरच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र दलाच्या (सीएपीएफ) 288 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी आणखी 90 कंपन्या तैनात करण्यात आल्या. या कंपन्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जात आहे. सीआरपीएफ, एसएसबी, आसाम रायफल्स, आयटीबीपी आणि इतर सशस्त्र दलांच्या कंपन्या मणिपूरमध्ये तैनात आहेत. तसेच प्रत्येक जिह्यात नवीन समन्वय कक्ष आणि संयुक्त नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले.

जवळपास 40 हजार जवान तैनात

मणिपूरला हिंसाचाराच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. मणिपूरमधील बिघडत चाललेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तेथे सैनिकांची अतिरिक्त फौज तैनात केली आहे. मणिपूरला तणावपूर्ण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी भारतीय सुरक्षा दल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राज्य पोलीस, आसाम रायफल्स आणि सीआरपीएफचे जवान यामध्ये मोठी भूमिका बजावतात. सरकारच्या नव्या निर्णयानंतर आता मणिपूरमध्ये आणखी 9 हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे मणिपूरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांची एकूण संख्या 40 हजारांच्या जवळपास पोहोचेल. हे सर्व सैनिक लवकरात लवकर मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतील.

Advertisement
Tags :

.