दसरा सुटीनंतर शाळांना प्रारंभ
पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची धावपळ
बेळगाव : दसऱ्याच्या सुटीनंतर सोमवारपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू आला. अठरा दिवसांच्या सुटीनंतर शाळांमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणींची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून आरामात असलेल्या पालकांना आता पुन्हा एकदा धावपळ करत पाल्यांना वेळेवर शाळेत आणून सोडावे लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. दि. 2 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दसरोत्सवाची सुटी देण्यात आली होती. रविवारी ही सुटी पूर्ण झाली आणि सोमवारपासून दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. सुटीदरम्यान देण्यात आलेला गृहपाठ तपासणे, त्याचबरोबर द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाची आखणी करणे यामध्ये शिक्षकवर्ग व्यस्त होते. वर्दी रिक्षाचालकही सोमवारपासून पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले.
पहिल्याच दिवशी मध्यान्ह आहार, अंडी वितरण
राज्य सरकारच्या सूचनेनुसार द्वितीय सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार व अंडी वितरण करण्यात आली. सध्या आठवड्यातील सहा दिवस अंडी वितरण केली जात आहेत. शाळांच्या सूचनेनुसार अंडी, चिक्की व केळी देण्यात येत आहेत. ज्या शाळांनी अंडी नाकारली, त्यांना चिक्की वितरण करण्यात आली. पहिल्याच दिवशी उपस्थिती कमी असल्याचे चित्र दिसून आले.