राज्यात सकाळी शाळा, दुपारी सर्वेक्षण
सर्वेक्षणाला 12 पर्यंत मुदतवाढ : सरकारी, अनुदानित शाळांच्या वेळेतही बदल : जातनिहाय गणतीचे काम अपूर्ण झाल्याने शिक्षण खात्याचा आदेश
बेंगळूर : राज्य सरकारने 22 सप्टेंबरपासून सुरू केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचे (जातनिहाय गणती) काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शालेय शिक्षण खात्याने सरकारी व अनुदानित शाळांच्या वेळेत बदल केला असून 12 ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षण सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे. सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण मागील 14 दिवसांपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून सुरू आहे. राज्य सरकारने 7 ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची मुदत दिली होती. मात्र, अनेक कारणांमुळे अपेक्षेप्रमाणे सर्वेक्षणकार्य पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शिक्षण खात्याने बेंगळूर वगळता राज्यभरात सर्वेक्षणाची मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. या दरम्यान येणाऱ्या सुटीच्या कालावधीतही सर्वेक्षण सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच 8 ऑक्टोबरपासून शाळेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये 8 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत वर्ग भरवावेत. त्यानंतर शिक्षकांनी सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवावे. सर्वेक्षणाचे काम सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
बेंगळुरात 24 ऑक्टोबरपर्यंत मुदत
ग्रेटर बेंगळूर कार्यक्षेत्रात सरकारी व अनुदानित शाळा 8 ते 24 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भरवाव्यात. त्यानंतर येथील शिक्षकांनी सर्वेक्षणकार्यात सहभागी व्हावे. बेंगळूरमध्ये 24 ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.
सर्वेक्षणाचे काम 71 टक्के पूर्ण : मधू बंगारप्पा
सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षणाचे काम 71 टक्के पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणाची मुदत 7 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतरही सर्वेक्षण सुरू ठेवावे का, याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या मागासवर्ग आयोगाचा सल्ला घेऊन निर्णय घेतील, असे शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा सांगितले होते. मंगळूर येथे सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना शिक्षणमंत्र्यांनी दसरा सुटी संपल्यानंतर 8 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. उर्वरित सर्वेक्षणाचे काम शनिवारी किंवा रविवारी करावे की शाळा सुरू होण्याच्या आधी किंवा वेळ संपल्यानंतर करावे याविषयी शिक्षणाधिकारी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतील, असे सांगितले होते.
95 टक्के शिक्षकांनी विनातक्रार सर्वेक्षणाच्या कामासाठी सहकार्य केले आहे. आता प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी केवळ 10 ते 11 मिनिटांचा वेळ लागत आहे. सरकारच्या सुविधा-सवलती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. तो सर्वांचा हक्क देखील आहे. त्यामुळे जनतेने न चुकता सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे. उडुपी व मंगळूर जिल्ह्यांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे, मॅपिंग आणि तांत्रिक समस्यांमुळे सर्वेक्षण संथगतीने सुरू आहे. मंगळूर जिल्ह्यातील सुळ्या तालुक्यात सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. बेळतंगडी येथे 76 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. बेंगळुरात सर्वेक्षण उशिरा सुरू झाले आहे, असे मधू बंगारप्पा यांनी सांगितले.