For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चोरट्यांकडून राज्यातील शाळा टार्गेट

06:50 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
चोरट्यांकडून राज्यातील शाळा टार्गेट
Advertisement

गोव्यातील बहुसंख्य शाळांच्या (हायस्कूल) रक्षणासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले नाहीत. एरवी घरफोड्या व इतर चोऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या चोरट्यांनी हीच संधी साधून आता शाळांना टार्गेट केले आहे. गेल्या वर्षभरापासून हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडू लागले असल्याने शाळांच्या प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. या चोरट्यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.

Advertisement

दरवर्षी गोव्यात वर्ष संपुष्टात येत असताना, गुन्हेगारी वाढण्याची चिंताजनक प्रवृत्ती दिसून आली आहे. गुन्हेगार कायद्याची भीती न बाळगता धाडसाने गुन्हे करीत आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही शाळांना चोरट्यांनी लक्ष्य केले. हे सत्र कायम असून 2024 मध्ये सुद्धा शाळांमध्ये सलगपणे चोऱ्या घडल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

Advertisement

कुडणे येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या आवारात अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने प्रवेश केला. हायस्कूलच्या कार्यालयातील ड्रॉवरची तोडफोड केली आणि अंदाजे रु. 60,000 ते रु. 70,000 इतकी रक्कम घेऊन पोबारा केला आहे. चोरी झालेल्या रोख रकमेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या नुकत्याच जमा झालेल्या परीक्षा शुल्काचा समावेश होता. यावरुन ही घटना माहितगाराच्या माध्यमातून झाली असावी का असाही संशय व्यक्त केला जात आहे. नेमकी शुल्करुपी रक्कम जमा झाल्यानंतर घटना घडावी म्हटल्यावर संशयाला जागा राहते. हायस्कूलतर्फे रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ञ आणि श्वान पथकाची मदत घेतली असून तपास केला जात आहे. अद्याप तरी पोलिसांना या प्रकरणाचा तपास लावणे शक्य झालेले नाही.

ऑक्टोबरनंतर डिसेंबर महिन्यातही शाळांमध्ये चोरी करण्याचे सत्र कायम राहिले. धारबांदोडा तालुक्यातील मोले येथील अभिनव विद्यामंदिरातही चोरीचा प्रकार घडला परंतु सुदैवाने या प्रकरणात चोरट्यांना रिकाम्या हाताने निघून जावे लागले. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी तपास सुरू केला परंतु या प्रकरणाचाही तपास अद्याप लागलेला नाही.

चोरट्यांनी उत्तर गोव्यानंतर दक्षिण गोव्याकडे आपला मोर्चा तेथील शाळांना लक्ष केले. शाळांमध्ये चोरी करणारी संघटित टोळी असावी, अशी शक्यता पोलिसांना आहे. शाळांमध्ये जे चोरीचे प्रकार घडतात, त्यात साम्य आहे. चोरांनी रोख रक्कम, सीसीटीव्ही आणि डीव्हीआर सिस्टमसह मौल्यवान वस्तूंना लक्ष्य केले होते. शाळांमधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे शाळा अधिकारी, पालक आणि रहिवासियांमध्ये भीतीचे वातावरण मात्र पसरले आहे. कारण पोलिसांना त्यांच्या तपासात अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही.

हल्लीच मुरगांव तालुक्यातील शाळांना लक्ष्य करणात आले आहे. वेळसांव येथील एका शाळेत चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम आणि 70,000 रुपये किमतीचे सामान चोरले आहे. मांगोर-वास्को येथील सेंट तेरेझा शाळेत अशीच चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मुख्याध्यापकांच्या केबिनच्या कुलुपामध्ये छेडछाड केली व दानपेटी, साधारणत: सुमारे 30,000 ऊपये आणि झेरॉक्स मशीन दुऊस्तीसाठीचा निधी रिकामा करण्यात आला. या व्यतिरिक्त, दरवाज्यांची तोडफोड आणि शिशु येशूच्या स्मारकाची विटंबना करण्यात आली होती. त्याचबरोबर 16 चॅनेलचे डीव्हीआर चोरीला गेले.

या चोरीनंतर हायस्कूलच्यावतीने सुरक्षेच्या उपाययोजनांच्या गरजेवर भर देण्यात आला आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शाळांची व्यवस्थापने हादरली आहेत. यावर उपाय म्हणून शाळांना सुरक्षा कर्मचारी पुरविण्याचे आवाहन शिक्षण विभागाला करण्यात आलेले आहे.

सासष्टीत कोलवा आणि कुंकळळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनुक्रमे माजोर्डा येथील उच्च माध्यमिक आणि असोळणा येथील हायस्कूल या दोन चर्च संचालित शाळांना चोरट्यांनी लक्ष्य बनवले आणि कार्यालयाच्या आवारातून रोख रक्कम आणि डीव्हीआर हिसकावले. दोन्ही घटनांमध्ये, चोरट्यांनी लुटमार करण्यापूर्वी सीसीटीव्ही पॅमेऱ्यांचे डीव्हीआर काढून टाकून सारखीच पद्धत अवलंबिल्याचे आढळून आले. चोरट्यांनी शाळांच्या मागील बाजूने कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी चोरट्यांनी अगोदर डीव्हीआर काढून टाकले. त्यामुळे चोरटे चोरी करताना किती सतर्क असतात, हे स्पष्ट होत आहे.

चोरट्यांनी शाळेतील रोख 2.95 लाख रुपये तसेच 40,000 ऊपये किमतीचे दोन डीव्हीआर, एकूण 3.35 लाख ऊपयांची चोरी केली. चोरीला गेलेली 2.95 लाख ऊपयांची रोकड विद्यार्थ्यांच्या गणवेषांशी संबंधित होती.

माजोर्डा येथील फा. बॅसिलियो आंद्राद उच्च माध्यमिक विद्यालयात नोंदविलेल्या अशाच घटनेत, अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयात प्रवेश केला आणि डीव्हीआर व्यतिरिक्त सुमारे 20,000 ऊपयांची रोकड लंपास केली.

गोव्यात घरफोडीचे प्रकार एका बाजूने सुरूच आहेत तर दुसऱ्या बाजूने शाळांना लक्ष्य करण्यावर भर दिलेला आहे. शाळांची व्यवस्थापने या प्रकारामुळे हतबल झालेली आहेत. पोलीस तक्रारी नोंद झाल्या तरी तपास मात्र शून्यच आहे. गोव्यातील शाळांमध्ये सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे. हे हेरूनच अज्ञात चोरट्यांनी शाळांना टार्गेट करण्यावर भर दिलेला आहे. सलगपणे शाळांमध्ये चोरी होत असताना एकाही प्रकरणाचा तपास लागू नये, हा दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल. तपास यंत्रणेवरच्या एकंदर कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतो आहे.

शाळांनी सुरक्षा रक्षक तैनात करावे, अशी मागणी हायस्कूलच्या व्यवस्थापनांकडून जोर धरू लागलीय. शिक्षण खाते त्या दृष्टिकोनातून पुढाकार घेणार का? ते येत्या काळात पाहावे लागणार आहे.

महेश कोनेकर

Advertisement
Tags :

.