केपीएस-मॅग्नेटच्या नावाखाली जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा घाट
एआयडीएसओ जिल्हा संचालक महांतेश बिळूर यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : राज्य सरकारने केपीएस-मॅग्नेटच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. मात्र राज्य सरकारने राज्यातील एकही शाळा बंद करणार नाही, असे सांगितले असले तरी शाळांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील 2283 शाळा बंद करून त्यांचे केपीएस शाळेमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. शाळा वाचविण्यासाठी व हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संरक्षण करण्यासाठी सामुदायिक लढ्याची आवश्यकता असून यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन एआयडीएसओचे जिल्हा संचालक महांतेश बिळूर यांनी केले आहे.
कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बिळूर म्हणाले, जिल्ह्यात एकूण 538 केपीएस मॅग्नेट शाळा ओळखण्यात आल्या आहेत. त्यानुसार चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 298 तर बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 240 शाळांचा समावेश आहे. यामध्ये 2283 शाळांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. रामतीर्थनगरमधील केपीएस शाळेत 27 शाळांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असून टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेट परिसरातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेमध्ये 67 शाळांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कोणत्या शाळा केपीएस-मॅग्नेट शाळा बनवाव्यात व त्यांच्यात कोणत्या शाळा विलीन कराव्यात याची यादी यापूर्वीच तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांच्या प्राध्यापकांच्या सेवा नियमामध्ये बदल करून त्यांना हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याची सूचना देत आहेत. यातून केवळ शाळाच नव्हेतर पदवीपूर्व महाविद्यालयेही बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. विलीनीकरणाच्या बहाण्याने शाळा बंद होणाऱ्या इमारतींचा इतर कामासाठी उपयोग करण्याचा डाव आहे. तसेच आगामी बेळगाव अधिवेशनात याबाबत विधेयक मांडण्यात येणार असल्याचेही समजते, असेही त्यांनी सांगितले.