दसरा-दिवाळी सुटीनंतर शाळा पुन्हा गजबजल्या
शिक्षक, विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण : दुसऱ्या सत्राला सुरुवात
बेळगाव : दसरा सुटीनंतर जिल्ह्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळा पुन्हा गजबजल्या. तब्बल एक महिन्याच्या दीर्घ सुटीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावा राहिला नाही. सकाळपासूनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लगबग, मित्र-मैत्रिणींच्या भेटी, गप्पा आणि हसण्याचे सूर गुंजत होते. एका महिन्याच्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पालकांनीही शाळा सुरू झाल्याने मोकळा श्वास घेतला. शाळेच्या गणवेशात सजलेली मुले पाठीवर दप्तर आणि हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन उत्साहाने शाळेकडे धावत हेती. दसरा सुटी संपल्यानंतर मुलांना आपली कला जपण्यास तसा पुरेपूर वेळ मिळत नसे. परंतु सर्वेक्षणाचे कार्य रखडल्याने सरकारने सुटीमध्ये वाढ केली होती. दसरा सुटीत 10 दिवसांची भर पडल्याने विद्यार्थ्यांनी गडकिल्ल्यांची उभारणी केली.
दरम्यान, या सुटीचा लाभ मुलांनी आपली कला व पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी केला. सुटीच्या काळात गडकिल्ले निर्माण करून, फटाके फोडून सण साजरा केला. मुलांनी गडकिल्ले तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण जागवली. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा शाळा सुरू झाल्याने दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबर शालेय क्रीडा, शैक्षणिक सहल, कुतुहलता निर्माण झाली आहे. महिन्याच्या कालावधीनंतर शाळेत परतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. पण, या वेळेत सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त शिक्षकांना मात्र म्हणावा तसा आनंद घेता आला नाही. दसरा आणि दिवाळी सुटी म्हणजे कुटुंबासोबत, पाहुण्यासोबत सणांचा आनंद घेणे. परंतु बहुतांश शिक्षकांना सर्व्हेमुळे सुटीचा लाभ झालेला नाही उलट लगेच दुसऱ्या सत्राच्या तयारीसाठी शिक्षकांना हजर रहावे लागले त्यामुळे काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
पालकांनी घेतला मोकळा श्वास
प्रदीर्घ दसरा सुटीनंतर गुरुवारपासून शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. यामुळे महिन्याभराच्या सुटीनंतर जिल्ह्यातील शाळा गजबजणार आहेत. दसरा, दिवाळी सण साजरा करून मुले नेहमीप्रमाणे शाळेत दाखल झाली. महिन्याभराच्या कालावधीत घरात असलेली मुले शाळेला गेल्याने पालकांनीही मोकळा श्वास घेतला. परिणामी शाळा पुन्हा गजबजल्याने शाळांचा नियमित दिनक्रम, उत्साह, आनंद, शैक्षणिक ऊर्जा सर्वत्र जाणवत आहे.