दुचाकी खड्ड्यात आपटून शाळकरी मुलगी ठार
लोणंद :
पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत माणिक सोना पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या खड्ड्यात मोटारसायकल आधळून झालेल्या अपघातात शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद करण्याचे रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस स्टेशनला चालले होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कि, सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाडेगाव येथील सूर्या हॉटेल येथे असणाऱ्या माणिक सोना पेट्रोल पंपासमोर बाळूपाटलाच्या वाडी येथील तिघेजण मोटार सायकलवरून निरा बाजूला जात असताना पेट्रोल पंपासमोर पडलेल्या खड्ड्यात मोटारसायकल उडून मोटारसायकल खाली पडल्याने मोटारसायकलवरील अंकिता अनिल धायगुडे (वय 20) ही शाळकरी मुलगी जागीच ठार झाली असून विशाल दौलत धायगुडे (वय 27), सानिका विलास धायगुडे (वय 18 सर्व रा. बाळूपाटलाचीवाडी) हे गंभीर जखमी झाले. विशाल याला पुणे येथे उपचारासाठी नेला असून सानिका हिच्यावर लोणंद येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पुणे सातारा रोडवर पाडेगाव गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर लोणंद नगरपंचायतीचे रस्त्याच्या कडेला कालपासून लोणंद नागरपंचायतच्या पाणी लाईनचे दुरुस्तीचे काम चालू होते. या कारणाने खड्डा पडून खड्ड्यात पाणी साचल्यामुळे हा अपघात झाल्याच्या कारणाने नगरपंचायतीच्या संबंधित असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बाळूपाटलाचीवाडी येथील ग्रामस्थांनी सकाळी साडेअकरा वाजता लोणंद येथे राजमाता अहिल्यादेवी चौक येथे सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आले व लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशील भोसले यांनी रास्ता रोको करणारांच्यात मध्यस्थी करत त्यांना लोणंद पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले.
पण तीन ते चार तास यावर तोडगा न निघाल्याने पुन्हा बाळूपाटलाचीवाडी येथील ग्रामस्थांनी 4 वाजता रास्ता रोको सुरु करत पाऊणतास रास्ता रोको केला. यावेळी बाळूपाटलाचीवाडी ग्रामस्थांनी मुख्याधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याहीवेळी सपोनि सुशील भोसले यांनी मध्यस्थी करत त्यांना लोणंद पोलीस स्टेशन येथे बोलावत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
बाळूपाटलाचीवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक
झालेली घटना ही लोणंद नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे झाली असल्याचा आरोप करत लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची संतप्त बाळूपाटलाचीवाडी ग्रामस्थांची मागणी होती. यामुळे बाळूपाटलाची वाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यांनी दोन वेळा मिळून सव्वा तास लोणंद येथे रास्ता रोको केला.