भटकळजवळ स्कूल व्हॅनला आग
सुदैवाने जीवितहानी टळली
कारवार : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी भटकळ तालुक्यातील वेंकटापूर येथील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर घडली. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आग लागलेल्या व्हॅनमध्ये काहींच्या मते दोन विद्यार्थी होते. तर अन्य काहींच्या मते बारा विद्यार्थी होते. या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, भटकळ तालुक्यातील हेबळे येथील न्यू शेम्स स्कूलच्या मालकीची व्हॅन सोमवारी दुपारी भटकळहून शिरसीकडे निघाली होती. वेंकटपूर येथे येताच व्हॅनला अचानक आग लागली. वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन रस्त्याच्या बाजुला थांबविले. या घटनेची माहिती ताडतीने भटकळ येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे व्हॅनला आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. व्हॅनला आग लागल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी भेट देवून भटकळ पोलिसांनी पाहणी केली.