सोमवारपासून शाळा पूर्ववत
विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची धावपळ
बेळगाव : आठवडाभरानंतर सोमवारी पुन्हा एकदा शाळा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजले. मागील आठवड्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे बेळगाव, खानापूरसह इतर तालुक्यांमध्ये शाळांना सुटी देण्यात आली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सोमवारपासून पुन्हा शाळा सुरुवात करण्यात आल्या. यामुळे सोमवारी सकाळपासूनच शाळा परिसरामध्ये विद्यार्थी-पालकांची गर्दी झाली होती.
आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. रस्त्यांवर पाणी आल्यामुळे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नव्हते. यामुळे जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार दि. 22 रोजी सुटी जाहीर केली. त्यानंतरही पावसाचा जोर सुरूच राहिल्याने शाळा टप्प्याटप्प्याने आठवडाभर बंद ठेवाव्या लागल्या. सोमवार दि. 29 पासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील शाळा पूर्ववत सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी बजावला.
आठवडाभरापासून शांत असलेला शाळांचा परिसर पुन्हा एकदा सोमवारपासून गजबजला. मागील काही दिवस विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडावे लागत नसल्याने पालकही आपल्या कामांमध्ये गुंतले होते. परंतु, सोमवारी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडण्याची जबाबदारी पुन्हा पालकांकडे आली. आठवडाभरात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांचीही धडपड सुरू झाली आहे.