साताऱ्यात नगरपालिकेच्या 3 शाळांच्या इमारत दुरुस्तीला सुरुवात
दोन वर्षापूर्वीच धोकादायक इमारत म्हणून हलवल्या तीन शाळा
सातारा : सातारा नगरपालिका शाळा क्रमांक 11, 14 आणि उर्दू शाळा क्रमांक 13 ची इमारत ही 40 वर्षापूर्वीची जुनी असून त्या इमारतीचा पश्चिम भाग धोकादायक बनला होता. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात त्या इमारतीचा भाग पडला होता. त्यादरम्यान, पालिका प्रशासनाने शाळा अन्यत्र हलवल्या होत्या. सध्या पालिका प्रशासनाने त्याच शाळेची इमारत निर्लेखन करून डागडुजी करण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. या शाळेचा पश्चिम भाग दुरुस्ती करण्यात येणार आहे.
सातारा येथे नगरपालिकेची शाळेची इमारत आहे. या इमारतीत तीन शाळा भरत होत्या. चाळीस वर्षांपूर्वी शाळा क्रमांक 11 14 आणि उर्दू शाळा क्रमांक 13 ही शाळा बांधली आहे. या शाळेच्या पूर्व भागातील प्रवेशद्वाराला जिन्यातच काही ठिकाणी भेगा गेल्याचे दिसते. तर जिना चढून गेल्यानंतरही त्याच्या खुणा पाहायला मिळतात. पश्चिम भागाच्या बाजूला शाळेचे शौचालय आणि पाण्याची टाकी होती. पाण्याच्या टाकीचे पाणी भिंतीमध्ये मुरल्याने भिंती धोकादायक बनली होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पावसात ती पडली. त्यानंतर तेथील स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर शाळा अन्यत्र हलवली होती.
शाळा नवीन बांधावी अशी मागणी वारंवार होत होती. पालिका प्रशासनाकडून शाळेच्या दुरुस्तीबाबत विषय मंजूर करून वर्कऑर्डरही दिली होती. त्यास दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. पश्चिम भागाच्या बाजूचे काम सुरु करण्यात आले आहे. धोकादायक सर्व भाग जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकला आहे. पश्चिम भागाचे काम केल्यानंतर ही इमारत काहीअंशी ऊर्जेत अवस्थेत दिसेल. मात्र पूर्व भागाचे काम करणे गरजेचे आहे, असे काहींनी सांगितले.
मुख्याधिकारी बापट यांच्यामुळे कार्यवाही
सध्या सातारा महानगरपालिका शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे. काही शाळांना इमारतीच नाहीत, कारण या शाळा पालिकेकडे नसल्याने पालिका ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत. निधी टाकू शकत नाहीत असे वारंवार सांगितले जाते. मात्र विद्यमान मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी या शाळेच्या दुरुस्तीसाठी प्राधान्याने विचार करून कार्यवाही सुरू केली आहे. किमान पावसाळ्यापूर्वी हे दुरुस्तीचे काम व्हावे अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त केली जात आहे.