बाची सरकारी शाळेतील शिक्षकाच्या बदलीच्या निषेधार्थ शाळेला ठोकले टाळे
वार्ताहर / उचगाव
बाची येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षक चांदीलकर यांची बदली कुद्रेमनी येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये केल्याच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी बाची गावातील पालक व ग्रामस्थांनी सदर बदली रद्द करावी, यासाठी गेटबंद आंदोलन छेडून गेटला टाळे ठोकले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चांदिलकर हे या शाळेतील एक आदर्श शिक्षक म्हणून ओळख आहे. त्यांच्या शिक्षणावर विद्यार्थ्यांची अधिक मर्जी असल्याने त्यांची बदली करण्यात येऊ नये. यासाठी शनिवारी बाची गावातील नागरिक, युवक मंडळांचे पदाधिकारी, पालक वर्ग आणि महिला वर्गाने या शाळेच्या आवारातील गेटला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. आणि चांदीलकर यांची तातडीने बदली रद्द करून त्यांना बाची या शाळेतच पूर्ववत ठेवावे, अशी मागणी केली आहे.
बाची शाळेतच त्यांना कायमस्वरूपी ठेवावे, अशी मागणी केली आहे. यावेळी बेळगाव तालुक्याचे बीईओ यांच्याशी काही पालकांनी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांनी शनिवारी शाळेकडे येणार नसल्याचे सांगितले, अशी चर्चा जमलेल्या जमावामध्ये सुरू होती. तरी ग्रामस्थ व पालकांच्या मतानुसार सदर बदली रद्द करावी, अन्यथा गेटबंद आंदोलन चालूच राहील. जोपर्यंत बदली रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. तसेच टाळेही खोलण्यात येणार नाहीत, असा इशारा एसडीएमसीचे अध्यक्ष राजू देवन, तुरमुरी बाची ग्रामपंचायत अध्यक्ष महादेव गुंजीकर, माजी अध्यक्ष गुंडू गुंजीकर, लक्ष्मण हुंद्रे ,केदारी जाधव, ग्रामस्थांनी दिला आहे.