जीसीएची नियोजित निवडणूक रद्द
पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) येत्या 24 ऑगस्ट रोजी नियोजित निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्या. भारती डांगरे आणि न्या. निवेदिता मेहता यांनी रद्द केली आहे. सदर निवडणूक आता 16 सप्टेंबर रोजी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्यातील क्रिकेट संबंधित सर्व व्यवहार पाहणारी जीसीए ही मुख्य संघटना आहे. जीसीएच्या ऊपेश नाईक यांच्यासह पाच सदस्यांनी विद्यमान व्यवस्थापक समितीने घाईघाईने आणि एकतर्फी मर्जीने 24 ऑगस्ट रोजी नियोजित निवडणूक जाहीर केल्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संघटनेचे अध्यक्ष विपुल फडके आणि उपाध्यक्ष शंबा म्हाळूं नाईक देसाई यांनी कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता 25 जुलै 2025 रोजी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याचा दावा केला आहे.
सदर बैठक दोन दिवसाआधी अचानक दुसरेच कारण सांगून बोलावण्यात आली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे 25 जुलै 2025 रोजी घेतलेल्या तातडीच्या बैठकीतील निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. सुनावणीवेळी दोन्ही पक्षाने जीसीएच्या बैठका कशा बोलावल्या जातात या नियमांवर वाद-विवाद केला. कायदेशीर तरतुदीच्या वादात न पडता न्यायालयाने दोन्ही पक्षांना सामोपचाराने निवडणूक घेण्यासाठी मान्य केले. त्यात 25 जुलै 2025 रोजी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत निवडणुकीचा कार्यक्रमावर अंमलबजावणी करू नये. तसेच निवडणूक नियमानुसार 45 दिवसानंतर, म्हणजे 16 सप्टेंबर रोजी घेण्याचा आदेश देऊन सदर याचिका निकाली काढण्यात आली. जीसीएची निवडणुकीची प्रक्रिया ठरवण्यासाठी आज 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता जीसीएच्या पर्वरी येथील सभागृहात बैठक होणार आहे.