‘स्कॅन’ करा, माटोळी पोहोचेल घरा!
सरकारच्या ‘गोवा ई बाझार’ चा उपक्रम : 1700 ऊपयात माटोळीसह फराळचा ‘कोम्बो पॅक’, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : सरकारने राज्यातील स्वयंसाहाय्य गटांच्या मदतीने ‘ई-बाजार’ संकल्पना समोर आणली असून त्याद्वारे माटोळीचे सामान व फराळ या दोन्ही प्रकारातील साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खास या साहित्यविक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या गोवाईबाजार डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि पैसे भरायचे, एवढेच काम ग्राहकाला करावे लागणार आहे. चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर किंवा आदल्या दिवशी सदर साहित्य ग्राहकाच्या घरी पोहोचते करण्यात येणार आहे. काल बुधवारी पर्वरी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरील माहिती दिली.
लोकांच्या मदतीसाठी व्यवस्था
गणेश चतुर्थीकाळात सर्वात महत्वाची असलेली खरेदी म्हणजे माटोळी आणि फराळ. या दोन्हीमधील जिन्नस, वस्तु या आगाऊ खरेदी करता येत नाहीत. आगाऊ खरेदी केल्यास त्या कुजून किंवा नासून जातात. त्यामुळे ऐन चतुर्थीच्या एक किंवा दोन दिवस अगोदरच त्यांची खरेदी करावी लागते. परिणामी बाजारात लोकांची झुंबड उडते. त्यातून घरातील साफसफाई, रंगरंगोटी, सजावट, आदी बरीच कामे अपूर्णच राहतात. त्यातून लोकांची गैरसोय होत असते. यावर उपाय म्हणून सरकारने ही व्यवस्था केली आहे.
माटोळीचे पारंपरिक साहित्य उपलब्ध
माटोळी आणि फराळ घरपोच सेवेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कोम्बो पॅकमध्ये माटोळीचे 14 जिन्नस तर फराळाचे 6 खाद्यपदार्थ देण्यात येणार आहेत. माटोळी साहित्यात तोरींग, मावळिंग, घागऱ्यो, कांगलां, फागलां, नागुलकुडो, माट्टां, आम्याचे ताळे, कावंडळां, आंबाडे, वर्सांमोगीं, सुपारी, विड्याचीं पानां आणि केवणीचो दोर, आदींचा समावेश असेल.
नेवऱ्या, लाडू, शंकरपाळी, फेणोरी
फराळाच्या खाद्यपदार्थांमध्ये 5 नेवऱ्यो, 7 बेसन लाडू, 200 ग्रॅम चकऱ्यो, 200 ग्रॅम शंकरपाळी, 200 ग्रॅम चिवडा आणि 200 ग्रॅम फेणोरी आदींचा समावेश असेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ज्याना क्यू आर कोड स्कॅन करता येत नसेल त्यांनी वॉटस्अॅप क्र. 9262626262 वर ‘हाय’ पाठवल्यास त्यांना लिंक पाठविले जाईल. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर ‘स्वयंपूर्णगोवा डॉट कॉम’ ही वेबसाईट खुली होईल. त्यावर माटोळी या शब्दावर क्लिक केल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.